दुखापतग्रस्त जसप्रित बुमराहऐवजी पर्यायी खेळाडू या नात्याने निवड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपसाठी दुखापतग्रस्त जसप्रित बुमराहऐवजी मोहम्मद शमीची पर्यायी खेळाडू या नात्याने निवड केली. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकातून या निवडीची माहिती दिली. यंदाची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा उद्यापासून (रविवार दि. 16) खेळवली जाणार आहे.
‘अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने भारतीय संघात बुमराहऐवजी शमीची निवड केली. शमी ऑस्ट्रेलियात पोहोचला असून तो सराव सामन्यापूर्वी ब्रिस्बेन येथे भारतीय पथकात दाखल होईल’, असे शाह यांनी पत्रकातून नमूद केले.
मोहम्मद शमी हाच मुख्य संघात बुमराहची जागा घेईल, असे वृत्त वृत्तसंस्थेने मागील महिन्यात दिले होते. मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकुर यांचा राखीव खेळाडूत समावेश असून ते लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहेत. यंदाची टी-20 वर्ल्डकप दि. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत होईल.
जसप्रित बुमराह बॅक स्ट्रेस प्रॅक्चरमुळे अनिश्चित कालावधीकरिता व्यावसायिक क्रिकेटमधून बाहेर फेकला गेला आहे. शमीने यापूर्वी यूएईत संपन्न झालेल्या मागील टी-20 वर्ल्डकपमध्ये आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावरील टी-20 मालिकेत शमी खेळणार होता. पण, त्याचवेळी कोरोनाची बाधा झाल्याने त्याला मालिकेतून माघार घेत आयसोलेशनमध्ये रहावे लागले होते. कोरोनातून सावरल्यानंतर शमीने एनसीएकडे फिटनेस सर्टिफिकेट सादर केले. शमीने आजवर 17 टी-20 सामने खेळत त्यात 18 बळी घेतले आहेत.









