दुबई / वृत्तसंस्था
आगामी आशिया टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तान संघात दुखापतग्रस्त डावखुरा गोलंदाज शाहिन आफ्रिदीऐवजी मोहम्मद हसनैनचा समावेश करण्यात आला. यापूर्वी, शाहिन शाह आफ्रिदीला उजव्या गुडघ्याची दुखापत झाल्याने 4 आठवडय़ांची सक्तीची विश्रांती घेण्याची सूचना केली गेली आणि त्यानंतर तो स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. यंदाची आशिया चषक टी-20 स्पर्धा दि. 27 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
22 वर्षीय मोहम्मद हसनैनने पाकिस्तानतर्फे 8 वनडेत 37.91 च्या सरासरीने 12 बळी घेतले असून 26 धावात 5 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. हसनैनने याशिवाय 18 टी-20 सामन्यात 30.70 च्या सरासरीने 17 बळी घेतले. यादरम्यान त्याचे सर्वोत्तम पृथक्करण 37 धावात 3 बळी, असे राहिले.
यंदाच्या 15 व्या आशिया चषक स्पर्धेत 6 संघ 2 गटात विभागले गेले असून भारत, पाकिस्तान व पात्रता संघाचा अ गटात तर श्रीलंका, बांगलादेश व अफगाणचा ब गटात समावेश आहे.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ ः बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), असिफ अली, फखर झमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुश्दिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वासिम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादीर.









