पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱयावर आले होते. 20 तासांच्या दौऱयात त्यांनी दहाहून अधिक कार्यक्रमात भाग घेतला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 33 हजार कोटींच्या 19 योजनांना चालना देण्यात आलेली आहे. म्हैसूर येथील अंबाविलास राजवाडय़ासमोर मंगळवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही पंतप्रधानांनी भाग घेतला. बसवराज बोम्माई मुख्यमंत्री झाल्यानंतर नमोंचा हा पहिलाच कर्नाटक दौरा.
या दौऱयात दक्षिण भारतावर अधिक भर देण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व निजदचा पगडा असलेल्या दक्षिणेत पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. जेणेकरून संख्याबळाअभावी कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’ राबवावे लागू नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींची प्रयोगशाळाच कर्नाटकात आहे. याच प्रयोगशाळेत राजकीय तोडफोडीचा सराव गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. कर्नाटकात ऑपरेशन करूनच सत्ता हस्तगत करावी लागली आहे. आजवर स्वबळावर भाजप सत्तेवर आलेला नाही. काँग्रेस-निजदला खिंडार पाडून सत्तेचा बोगदा तयार झाला आहे. आता भाजपला स्वबळावर सत्तेवर यायचे आहे. कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही ‘ऑपरेशन कमळ’चा प्रयोग सुरू आहे. कर्नाटकात ‘ऑपरेशन कमळ’चा जन्म झाला. आता भाजपचे त्याचे राष्ट्रीयीकरण सुरू केले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. महाराष्ट्रातील घडामोडींवर कर्नाटकाचीही बारीक नजर आहे.
पंतप्रधानांच्या कर्नाटक दौऱयानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा उत्साह वाढला आहे. कारण गेल्या आठवडय़ापर्यंत कर्नाटकात नेतृत्व बदल होणार, ही चर्चा होतीच. पंतप्रधानांनी आपल्या दौऱयात बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ दौडू दे, त्याला आमची साथ आहेच, असे सांगत पुढच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच होणार, याचे जणू सूतोवाच केले आहे. पक्षांतर्गत गटबाजी, एकमेकांविरुद्ध सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आक्रमकपणा आदींमुळे बसवराज बोम्माई यांनाही बरीच कसरत करावी लागली. प्रत्येक आठ-पंधरा दिवसांनी नेतृत्व बदलाची आवई उठविली जायची. नेहमी अस्थिरतेच्या वातावरणातच त्यांना स्थिर रहावे लागत होते. सार्वत्रिक निवडणुकीला केवळ दहा महिने शिल्लक राहिले आहेत. या अल्पकाळात नेतृत्व बदल करणे व्यवहार्य ठरणार नाही, असा विचार पक्षाने केला आहे का? हाच संदेश देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
पंतप्रधानांच्या या कर्नाटक दौऱयावर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी टीका केली आहे. गेली दोन वर्षे कर्नाटकात पूर आला, सर्वसामान्यांना पुराचा फटका बसला. त्यावेळी परिस्थिती पाहण्यासाठी पंतप्रधानांना कर्नाटकाचा दौरा करावा, असे वाटले नाही, असे सिद्धरामय्यांनी टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताच डबल इंजीन सरकारचे फायदे काय आहेत? हे सांगत राज्य आणि केंद्रात एकच पक्षाचे सरकार असले तर राज्याचा विकास वेगाने होतो, अशी भलावण मोदींनी केली. या डबल इंजीन सरकारमुळेच कर्नाटकात विकासकामे राबविली जात आहेत, हे सांगतानाच पुढची निवडणूक विकासाच्या मुद्दय़ावर लढविली जाणार, हेच जणू पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात कर्नाटकात घडलेल्या घडामोडींची जागतिक पातळीवर ठळक चर्चा झाली. हिजाब, हलाल, शाईफेक आदी मुद्दे गाजले. सरकारवर टीका झाली. सरकारनेही विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. पुढची निवडणूक विकासाच्या मुद्दय़ावर होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तयारीला लागण्याचे अप्रत्यक्ष आदेशच जणू पंतप्रधानांनी दिले आहेत.
बेंगळूर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन झाले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हेही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोदींनी येडिंशी आस्थेने चर्चा केली. याचाच अर्थ आगामी निवडणुकीत जादुई आकडा गाठण्यासाठी येडियुराप्पा यांची मदत लागणारच, याचा प्रत्यय आला. कोणत्याही परिस्थितीत येडियुराप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रमुख पदे, उमेदवारी मिळू नये, यासाठी त्यांचे पक्षांतर्गत हितशत्रू प्रयत्नशील आहेत. घराणेशाहीच्या राजकारणावर नेहमी काँग्रेसवर टीका होते. त्यामुळे पंतप्रधानांचा त्याला विरोध आहे. भाजपमध्येही या प्रथेची सुरुवात होऊ नये, यासाठी ते प्रयत्नरत असतात. येडियुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी कोअर कमिटीत निर्णय झाला. मात्र, हायकमांडने तो निर्णय मानला नाही. आता विधानसभेसाठी विजयेंद्र यांना उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
20 तासांच्या कर्नाटक दौऱयातून ज्यांना जो संदेश द्यायचा आहे, तो नमोंनी त्यांना आडून आडून दिल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई रिलॅक्स झाले आहेत. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा ठळक चर्चेत येणार आहे. वारंवार या ना त्या कारणाने विस्तार लांबणीवर टाकला जातो आहे. केवळ दहा महिन्यात नवे मंत्री काय काम करणार आहेत? हा मुद्दाही आहेच. देवी चामुंडेश्वरीचे दर्शन घेण्यासही पंतप्रधान विसरले नाहीत. दक्षिणेतील प्रसिद्ध सुत्तूर मठात पंतप्रधानांचा कार्यक्रम झाला. त्याचा फायदा पक्षाला होणार आहे. मात्र, भाजप याचा नेमका लाभ उठवतो आणि आपली मुद्रा कशी वठवतो, याकडे पक्षाचे यश अवलंबून आहे. काँग्रेसनेही दक्षिणेतील जिल्हय़ांवरच आपले लक्ष केंद्रित केले आहे. बीबीएमपी, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीत राज्यातील नागरिकांचा कल समजून घेता येणार आहे. मात्र, जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलण्याची तयारी सुरू आहे.








