ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान मोदींची रावणाशी तुलना करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रावणाप्रमाणे आहेत. वाराणसीनंतर आता पंढरपूर उद्धवस्त करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना हाताशी धरले आहे, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
पंढरपुरात उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. मात्र, या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसर व प्रदक्षिणामार्गाच्या आतील जवळपास पाचशेहून अधिकची घरे भूसंपादित होण्याची शक्यता असल्याने या कॉरिडोरला स्थानिकांचा विरोध होत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनीही या कॉरिडोरला विरोध केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मोदी रावणाप्रमाणे आहेत. वाराणसीनंतर ते आता पंढरपुरातील पवित्र स्थळ नष्ट करण्याचा डाव आखत असल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरले आहे. पण मी हे थांबवण्यासाठी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.”









