ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच मुद्यावरुन भाजपचे मीडिया प्रभारी नवीन जिंदाल यांनी एक वादग्रस्त ट्विट केले. त्यानंतर बहारीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसह अन्य अरब देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त करत निषेध नोंदवला. तसेच भारतीय दुतावासांना यासंदर्भात समन्सही बजावले. त्यानंतर भाजपने या दोन्ही प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
मात्र, तेवढ्याने हा वाद शमलेला नाही. आता अरब देशातील कचरा कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी यासंदर्भातील फोटो ट्विट करत म्हटले आहे की, “मोदींना आमचा देशात विरोध आहे. मोदी आणि भाजपला आम्ही देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच. मात्र, कोणत्याही अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कदापी स्विकारार्ह नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी.”
गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या सदस्य देशांमध्ये मोठय़ा संख्येने भारतीय वास्तव्य करतात. गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलमध्ये प्रामुख्याने कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहरीन या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये लाखो भारतीय काम करतात. आखाती देशात स्थलांतरित कामगारांपैकी 30 टक्के कामगार हे भारतीय आहेत. आखाती देशांसोबत भारताचे चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, अशा परिस्थितीत भारताविरोधात आखाती देशांमध्ये अशाप्रकारे संताप व्यक्त होणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.









