बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस प्रवाशांना सोडून धावली
बेळगाव : पूर्वकल्पना न देताच अचानक रेल्वे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने प्रवाशांना फटका बसल्याची घटना रविवारी बेळगाव रेल्वेस्थानकात घडली. मागील काही दिवसांपासून रात्री 8 वाजता धावणारी बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस सायंकाळी 6 वाजताच निघून गेल्याने प्रवासी मात्र अडकून पडले. बुकिंग करूनही वेळेपूर्वीच एक्स्प्रेस निघाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस मंगळवार दि. 26 सप्टेंबरपासून बेळगाव-म्हैसूर मार्गावर धावत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रकात बदल करण्याची सूचना उद्घाटनावेळी कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी केली होती. या सूचनेची दखल घेत नैर्त्रुत्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला. परंतु, बदललेले वेळापत्रक वृत्तपत्र अथवा समाजमाध्यमांना न देताच नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे धावली. रविवार दि. 1 ऑक्टोबरपासून म्हैसूर एक्स्प्रेस नव्या वेळापत्रकानुसार धावली. दररोज रात्री 8 वाजता निघणारी एक्स्प्रेस रविवारी मात्र सायंकाळी 6 वाजताच निघून गेली. रात्री उशिरा रेल्वेस्थानकात दाखल झालेल्या प्रवाशांनी अधिकारीवर्गाला जाब विचारला. वेळापत्रकात बदल झाल्यास तशी माहिती संबंधित प्रवाशांच्या मोबाईलवर देणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांना पैसे भरून देखील एक्स्प्रेस चुकल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला होता.
असे असणार नवे वेळापत्रक
सायंकाळी 6 वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस सकाळी 5.55 वाजता म्हैसूरला पोहोचेल. तर रात्री 8.45 वाजता म्हैसूर येथून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 8.45 मिनिटांनी बेळगावला पोहोचणार आहे. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकानुसार प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.









