दापोली :
येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ई-मेल आयडीमध्ये फेरफार करून सुमारे 12 कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात 11 लाख 94 हजार 933 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी दुपारी 2.50 ते 5 जून रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ई-मेल आयडीमध्ये फेरफार करून त्यातील बँकेच्या ईमेल आयडीमध्ये अज्ञाताने बदल केला. मेलवरील एक्सेल शीटमध्ये बदल करून त्यामध्ये दुसरे खाते नंबर टाकून ही बनावट एक्सेल शीट स्टेट बँक ऑफ इंडिया दापोली शाखेच्या मेल आयडीवर पाठवली. त्यानंतर हा मेल डिलीट करून त्यात बदल केला. यातून विद्यापीठाच्या 12 निवृत्ती वेतनधारकांची सुमारे 11 लाख 94 हजार 933 रुपये रक्कम लंपास करून अज्ञाताने फसवणूक केली.
याबाबत विद्यापीठाच्या धनश्री सामंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66,66 (सी) (ड) बी. एन. एस. कलम 318 (2) (4) 319 (2) 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ई-मेलमध्ये फेरफार करणारा हा नक्की कोण आहे, हे शोधण्याचे आवाहन दापोली पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
..








