केसीआर यांचा दावा : प्रादेशिक पक्षांना येणार अच्छे दिन
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहुमत मिळणार नाही. आगामी काळात प्रादेशिक पक्षांना चांगले दिवस येणार असून त्यांच्याच आघाडीचे केंद्रात सरकार येण्याची शक्यता असल्याचा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका प्रचारसभेत बोलताना केला आहे.
तेलंगणाला एकही वैद्यकीय महाविद्यालय आणि नवोदय विद्यालय न देऊ शकलेल्या पक्षाला राज्यातील लोकांनी का मतदान करावे? भाजप हा सांप्रदायिक कट्टरतेला खतपाणी घालणारा पक्ष आहे. जोपर्यंत हा केसीआर जिवंत आहे तोवर तेलंगणा धर्मनिरपेक्ष राज्य राहणार असल्याचे वक्तव्य बीआरएस प्रमुखाने केले आहे.
केसीआर यांनी अल्पसंख्याकांबद्दलच्या चिंतेवरून काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. 2014 मध्ये तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी सत्तेवर असलेल्या काँग्रेसने अल्पसंख्याकांच्या विकासासाठी केवळ 2 हजार कोटी रुपये खर्च केले. तर बीआरएस सरकारने मागील एक दशकात 12 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी पुरविला आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोघेही परस्परांपेक्षा फारसे वेगळे नाहीत. त्यांना मतदान करणे वाया जाणार असल्याचा दावा केसीआर यांनी केला आहे.
काँग्रेस नेत्यांना सरड्याची उपमा
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के. कविता यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे पाहून सरड्यालाही लाज वाटणार आहे. काँग्रेस नेते दिवस बदलला की स्वत:ची भूमिका बदलत आहेत, असे कविता यांनी म्हटले आहे.









