क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची विधानसभेत माहिती : 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार स्पर्धा
पणजी : गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन 25 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास उद्घाटक म्हणून उपस्थित राहाणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत दिली. त्या स्पर्धांचा समारोप 9 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात वाचनालय धोरणाची कार्यवाही करणार असल्याचे सांगून वाचनालयाचा प्रसार, प्रचार शहरी – ग्रामीण भागात करण्याचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. कला – संस्कृती, क्रीडा आणि युवा व्यवहार व ग्रामीण विकास खाते यांच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना गावडे बोलत होते. ते म्हणाले की, अनेक क्रीडा संस्थांना आर्थिक अनुदान देण्याचे बाकी असून येत्या चतुर्थीपूर्वी ऊ. 2.54 कोटीचे अनुदान त्यांना देण्यात येणार आहे. तसेच पदके मिळालेल्या दिव्यांग खेळाडूंना ऊ. 73 लाखांची बक्षिसे मिळणार असल्याचे गावडे यांनी नमूद केले.
नवीन वाचनालय धोरण लागू करणार
वाचनालये वाढवणे याला महत्त्व देण्यात आले असून वास्को, फोंडा, कुडचडे येथे वाचनालयासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. स्पर्धात्मक परीक्षांसाठी वाचन महत्त्वाचे असून डॉ. नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने साकार केलेले वाचनालय धोरण लागू करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.
कला अकादमीचे लोकार्पण अद्याप नाही
कला अकादमीचे पुन्हा लोकार्पण करण्यासाठी कोणतीही तारीख किंवा मुदत सध्या तरी देता येणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने ताबा दिल्यानंतरच ती जनतेसाठी खुली होणार आहे. अकादमीची तपासणी चालू ऑगस्ट महिन्यात करण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेच्या वेळी आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमी उद्घाटनाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर गावडे यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
फुटबॉल क्लबना मदत करा : आलेक्स रेजिनाल्ड
चर्चिल ब्रदर्सच्या एफसी क्लबला 3 वर्षात मिळून ऊ. 9 कोटी दिले तर गोवा फुटबॉल महामंडळाने ऊ. 1.82 कोटी दिले. क्लबला 50 टक्के गोवन खेळाडू नाहीत तरी देखील एवढी मदत मिळते. अनेक क्लबना मदत मिळाली नाही अशी तक्रार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली. त्यांना मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. गावात सभागृह, स्मशानभूमी महत्त्वाचे असून त्यादृष्टीने ग्रामीण विकास खाते काम करीत आहे. त्या खात्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी आहे. ते खाते केंद्राशी जास्त संबंधित असल्याने केंद्राच्या निधीवरच तो विषय अलवंबून असल्याचे गावडे म्हणाले. गोवा हाटचे (बाजार) नियोजन सुऊ असून त्याची ऊपरेषा बदलण्याची गरज आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती गावडे यांनी दिली.
प्रमाणपत्र न दिल्याने पुढील अनुदान रखडते
व्यायाम शाळांना (जीम) देखील खात्याने महत्त्व दिले असून राज्यात सरकारतर्फे 55 व्यायामशाळा चालतात. त्यातील 11 अलिकडेच सुऊ करण्यात आल्या आहेत. अनेक क्लबना (क्रीडा संस्था) 80 टक्के अनुदान दिले जाते, परंतु दिलेल्या अनुदानाचे वापर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे पुढील अनुदान रखडते, याकडे गावडे यांनी लक्ष वेधले आणि कुणाचेही अनुदान अडवले जात नाही, असे नमूद केले. गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम झाले पाहिजे. तो विषय गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येतो. त्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे गावडे म्हणाले. खात्यांचे अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर भर आणि प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनात पारदर्शकता ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी – सत्ताधारी आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील क्रीडा सुविधा, समस्या सांगितल्या आणि त्या सोडविण्याचे आश्वासन गावडे यांनी दिले.
तरतूद मोठी, प्रत्यक्ष खर्च कमी : सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई यांनी मंत्री गावडे यांच्या खात्यातील विविध कामांसाठी करण्यात आलेली तरतूद मोठी व प्रत्यक्ष खर्च मात्र लहान अशी यादी वाचून दाखवत खात्यातील कामगिरीची ‘पिसे’ बाहेर काढली. राज्य युवा धोरण कागदावरच असून त्यासाठी ऊ. 2.2 कोटीची तरतूद आहे परंतु तो निधी कसा वापरणार याचा पत्ताच नाही. सरदेसाई यांनी गावडे यांच्या तीन प्रमुख खात्यांतील एकंदरित कामाकाजाचा चांगलाच पंचनामा केला. बाकीच्या आमदारांनी मात्र मतदारसंघासाठी विविध मागण्या केल्या. अर्थसंकल्पाच्या कार्यवाही अहवालातून सरदेसाई यांनी खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.









