ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन आज 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढदिवसानिमित्त मातोश्रींची भेट घेण्यासाठी मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. मोदींनी सकाळीच मातोश्री हिराबेन यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. तसेच त्यांना पुष्पहार घालून त्यांच्यासोबत घरातील देवांचीही पूजा केली. यावेळी मोदींनी हिराबेन यांना एक शालही गिफ्ट दिली. मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरून याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
हिराबेन सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात. हिराबेन मोदी यांचा जन्म 18 जून 1923 साली झाला होता. आज 18 जून 2022 मध्ये त्या आपल्या 100 व्या वर्षात पाऊल टाकत आहेत. नरेंद्र मोदींनी त्यांच्या मातोश्रींच्या निरोगी आयुष्यासाठी वडनगर येथे काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
दरम्यान, मोदींच्या हस्ते गुजरातमध्ये आज विविध विकासकामांचेही उद्घाटन होणार आहे. गांधीनगरमधील एका नव्या रस्त्याला हिराबेन यांचं नाव दिलं जाणार आहे. त्यानंतर मोदी वडोदरा येथे एका रॅलीला संबोधित करतील. गुजरात गौरव अभियानाअंतर्गत 16 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मोदी आज करणार आहेत.









