राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशी जाहीरात देऊन शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा लोकप्रिय असल्याची जाहीरात केली. त्यामुळे शिंदे गटाला भाजपा नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अजित पवार यांनी दोन दिवस पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि शिंदे गटाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहे. आता भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका करताना बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नसल्याचे म्हटले आहे.
वाशिममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, “विदर्भात एक म्हण आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत असं मला वाटत आहे.”असे ते म्हणाले.
पुढे बोलताना खासदार अनिल बोंडे यांनी “ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. उद्धव ठाकरेंना सुद्धा वाटत होतं की, मुंबई म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथ शिंदेंनाही तसच वाटत आहे की, ठाणे म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र. शिवसेना शिंदे गटाला आगामी निवडणूकीत वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचं मन दुखावून चालणार नाही किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही.” असा ही इशारा त्यांनी दिला.