एससीओ परिषदेदरम्यान समरकंदमध्ये भेटणार : युक्रेन युद्ध, अन्नसुरक्षेवर चर्चा शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उझ्बेकिस्तानातील शहर समरकंदमध्ये 15-16 सप्टेंबर रोजी शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एससीओची शिखर परिषद आयोजित पेली जाणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी हाणार आहेत. या परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी त्यांची भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान रशिया-युक्रेन युद्ध तसेच अन्नसुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होऊ शकते.
एससीओ शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ भाग घेणार आहेत, परंतु या दोन्ही नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन द्विपक्षीय बैठका निश्चित झाल्या आहेत. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत आणि उझ्बेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्जियोयेव्ह यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच या दोन्ही नेत्यांसोबतची चर्चा ही एससीओ परिषदेच्या व्यतिरिक्त होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले होते आणि ते अद्याप सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांना प्रचंड नुकसान झाले आहे. प्रारंभिक आघाडीनंतर रशियाला आता युक्रेनच्या उत्तर हिस्स्यात मोठे नुकसान सहन करावे लागल्यावर माघार घ्यावी लागली आहे. दुसरीकडे या युद्धामुळे अन्नसंकट गडद झाले आहे. या अन्नसंकटावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उझ्बेकिस्तानचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीत करू शकतात.
आणखी गाठीभेटी शक्य
उझ्बेकिस्तानातील भारताचे राजदूत मनीष प्रभात यांच्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आणखी काही नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ शकतात. चीनचे अध्यक्ष आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत भेट होणार की नाही याबद्दल काहीही बोलणे विदेश मंत्रालय टाळत आहे. तर दुसरीकडे जिनपिंग आणि पुतीन यांच्यातील चर्चेकडे जगाचे लक्ष लागून राहणार आहे. या दोन्ही देशांसोबत अमेरिकेचा तणाव सुरू आहे.
इराणच्या राष्ट्रपतींचा सहभाग शक्य
कोरोना संकटामुळे दोन वर्षांमध्ये राष्ट्रप्रमुखांना परस्परांच्या गाठीभेटी घेता आल्या नव्हत्या. याचमुळे मध्य आशियाई देशांमधील उद्योग तसेच व्यापारासंबंधी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. संपर्कयंत्रणा तसेच गुंतवणुकीचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी या परिषदेत सामील होण्याची शक्यता आहे. रईसी उझ्बेकिस्तानात पोहोचल्यास मोदी आणि त्यांची भेट होणार असल्याचे मानले जात आहे. 2023 मध्ये एससीओ परिषदेचे आयोजन भारतात होणार आहे.









