वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, वॉशिंग्टन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, 18 एप्रिल रोजी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अफाट शक्यतांवर दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच टेस्ला कंपनीच्या भारतातील प्रवेशाबाबतही द्वयींमध्ये संवाद झाला. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती शेअर केली. पंतप्रधान मोदी यांनी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी केलेल्या अमेरिका दौऱ्यावेळी ते एलॉन मस्क यांना प्रत्यक्ष भेटले होते.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर चर्चेसंबंधीची माहिती ट्विट केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या आमच्या बैठकीत समाविष्ट असलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्याच्या अफाट शक्यतांवर आम्ही चर्चा केली. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी वाढवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
टेस्लाचे अधिकारी भारत दौरा करणार
वृत्तानुसार, अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या भारतात प्रवेशाच्या शक्यतेदरम्यान कंपनीचे अधिकारी चालू महिन्यातच भारतात येत आहेत. टेस्लाचे अधिकारी एप्रिलमध्ये भारताला भेट देतील. येथे ते कंपनीच्या कामकाजाशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), अवजड उद्योग मंत्रालय, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भेटतील. टेस्लाने आपले उत्पादन केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्रातील चाकण, संभाजी नगर आणि गुजरात ही पसंतीची ठिकाणे निवडली आहेत. कंपनी सुरुवातीला भारतात उत्पादन सुविधा उभारण्यासाठी 3 ते 5 अब्ज डॉलर्स (अंदाजे रुपये 2.7 ते 4.3 लाख कोटी) गुंतवणूक करेल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
भरती प्रक्रिया सुरू
टेस्ला प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी कंपनीने भारतात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. 17 फेब्रुवारी रोजी कंपनीने लिंक्डइनवर 13 पदांसाठी भरतीची घोषणा केली. यामध्ये ग्राहक सेवा आणि बॅकएंड ऑपरेशन्सशी संबंधित पदांचा समावेश होता. टेस्ला आणि भारत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अधूनमधून चर्चा होत आहेत, परंतु उच्च आयात शुल्कामुळे टेस्ला भारतापासून दूर राहिली होती. तथापि, भारताने आता 40,000 डॉलर्स (सुमारे 35 लाख रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या कारवरील आयात शुल्क 110 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे टेस्लाचा भारतातील प्रवेश सुकर झाला आहे.









