जागतिक पातळीवर सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांचे सर्वेक्षण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. एका सर्वेक्षणानुसार त्यांना 75 टक्के रेटिंग मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता इतर देशाच्या नेत्यांपेक्षा जास्त असल्याने ते क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. मोदी यांच्या खालोखाल मेक्सिकोचे अध्यक्ष लोपेझ ओब्राडोर यांची लोकप्रियता असली तरी 12 टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकास्थित ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने हे सर्वेक्षण केले आहे. हे रेटिंग 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहेत.
जागतिक पातळीवर लोकप्रियतेचा विचार केला तर कोणताही नेता भारतीय पंतप्रधानांच्या जवळ येत नाही. 75 टक्के मान्यता रेटिंगसह ते प्रौढ वर्गामध्ये सर्वात लोकप्रिय जागतिक नेते ठरले आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2021 आणि जानेवारी 2022 मध्ये पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीतही अव्वल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही जगात कायम आहे. मोदींनी पुन्हा एकदा जागतिक नेत्यांना 75 टक्क्मयांच्या मान्यता रेटिंगसह मागे टाकले आहे. जागतिक रेटिंगमध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंदेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (63 टक्के) यांचा दुसरा तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (58 टक्के) तिसऱया स्थानावर आहेत. इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी 54 टक्के मंजूर रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहेत. 22 जागतिक नेत्यांच्या यादीत स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांना 50 टक्के तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना 41 टक्के मानांकन मिळाले आहे. बायडेन यांच्यापाठोपाठ कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो 39 टक्के आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना 38 टक्के मूल्यांकन मिळाले आहे.
‘मॉर्निंग कन्सल्ट’ ही पॉलिटिकल इंटेलिजन्स सध्या ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, जर्मनी, भारत, मेक्सिको, नेदरलँड, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेतील नेत्यांचा आणि मान्यता रेटिंगचा मागोवा घेत आहे. हे व्यासपीठ राजकीय निवडणुका, निवडून आलेले अधिकारी आणि मतदानाच्या मुद्यांवर रिअल-टाईम मतदान डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट दररोज 20,000 पेक्षा जास्त लोकांशी संवाद साधत असते.
चर्चेतील नेत्यांचे मूल्यांकन…
नरेंद्र मोदी (भारत) ः 75 टक्के
लोपेझ ओब्राडोर (मेक्सिको) ः 63 टक्के
अँथनी अल्बानीज (ऑस्ट्रेलिया) ः 58 टक्के
मारियो द्राघी (इटली) ः 54 टक्के
मॅग्डालेना अँडरसन (स्वीडन) ः 50 टक्के
जो. बायडेन (अमेरिका) ः 41 टक्के









