काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची जोरदार टीका
पणजी./ प्रतिनिधी
आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सरकार चालवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, कारण ब्रिटिशांनी तिजोरी रिकामी केली होती. त्या परिस्थितीतही त्यांच्या दूरदृष्टीने देशात विविध संस्था आणि प्रकल्पांच्या रूपात भक्कम साधनसुविधा निर्माण केली ज्याचा उपयोग भारताच्या सर्वांगिण प्रगतीत झाला. दुर्दैवाने मोदी सरकार आज देशाच्या संपत्तीची एकामागून एक विक्री करत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
पणजी येथील काँग्रेस भवनात सरचिटणीस ऍड. श्रीनिवास खलप आणि उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेलेल्या स्थानिक ज्ये÷ नागरिकांना व इतर गोमंतकीयांना प्रवेश नाकारण्याच्या भाजप सरकारच्या कृत्याचा निषेध केला.
मोदी यांना हे कळायला पाहिजे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मागील 70 वर्षांतील 74 विमानतळांच्या तुलनेत गेल्या आठ वर्षांत जवळपास 66 नवीन विमानतळ निर्माण झाले आहेत. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर काँग्रेस सरकारचा भर होता हे पंतप्रधानांना कळायला हवे होते. आयआयटी-खरगपूर, ललित कला अकादमी, एम्स्, भारताची हरित क्रांती, 1962 मध्ये स्थापित केलेला पहिला संगणक, 1970 ची धवल क्रांती, भारताची पहिली अणुचाचणी, आर्यभट्ट उपग्रहाचे प्रक्षेपण, गोव्यात 1983 चे चोगम रिट्रीट, अंतराळात पहिला अंतराळवीर पाठवणे, माहिती तंत्रज्ञान क्रांती, भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी हे काँग्रेस सरकारने निर्माण केलेले काही महत्वाचे प्रकल्प व योजना आहेत ज्यांनी भारताला आकार दिला, असा दावा अमित पाटकर यांनी केला.
विदेशवाऱयांवर वायफळ खर्च
आयुर्वेद आणि निसर्गोपचार केंद्र गोव्यातील पर्यटनाला चालना देऊ शकतात, असे पंतप्रधानांनी काल सांगितले. कोळसा वाहतूक सुलभ करण्यासाठी पर्यटन विभाग जेटी धोरण करण्यात व्यस्त आहे. विदेश वाऱयांवर वायफळ खर्च करुन पर्यटन उद्योगाला रसातळाला नेले. पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्याही पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पर्यटन विभाग अपयशी ठरला आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.
निमंत्रणपत्रिकेवर उल्लेख नसल्याचा निषेध
मोपा विमानतळावर प्रवेश नाकारून अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेची माफी मागावी अशी आपली मागणी आहे. विमानतळाच्या उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचा आणि दक्षिण गोव्याच्या खासदारांचा उल्लेख न करण्याच्या सरकारच्या कृतीचा काँग्रेस पक्ष निषेध करतो, असेही ते म्हणाले.
पणजी येथे जागतिक आयुर्वेदिक काँग्रेसचे आयोजन करून वाहतूक कोंडी आणि वाहतूक बंद करून नागरिकांची गैरसोय केल्याचा आरोपही पाटकर यांनी भाजप सरकारवर केला. आयुष रुग्णालयाचे उद्घाटन त्या परिसरात का केले नाही, असा सवालही पाटकर यांनी केला.









