वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन हे जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात जाणार असून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 8 सप्टेंबरला भेट घेतील, अशी माहिती राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणाऱ्या व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बायडेन यांच्या पत्नी जिल यांना कोरोना झाल्याने बायडेन यांचीही वैद्यकीय परीक्षणे घेण्यात आली होती. तथापि, त्यांना कोरोनाची कोणतीही लागण झालेली नाही, हे स्पष्ट झाल्याने त्यांच्या भारत दौऱ्याची निश्चिती करण्यात आली आहे. ते 7 सप्टेंबरला भारतात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात अमेरिका जी-20 शिखर परिषदेच्या माध्यमातून विकसनशील देशांशी जवळिकीचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी साधणार आहे. विकसनशील देशांच्या आवश्यकता लक्षात घेणे, अमेरिकेच्या नागरिकांच्या हितांची आणि प्राथमिकतांची जपणूक करणे, तसेच वातावरणीय परिवर्तन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांसंबंधी भूमिका घेणे आदी धोरणांवर भर देणार आहे, असे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
न्यायोचित आणि स्थायी शांततेसाठी प्रयत्न
जी-20 परिषदेत बायडेन युव्रेनमधील न्यायोचित आणि स्थायी शांततेच्या कार्यक्रमावर भर देतील. युक्रेनची समस्या सोडविताना संयुक्त राष्ट्रसंघाची संहिता आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांचा आधार घेण्याची आवश्यकता ते अधोरेखित करतील. त्याचप्रमाणे समावेशक डिजिटल परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा समंजस उपयोग, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि पर्यावरण संवर्धन या जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही ते अमेरिकेची भूमिका मांडतील, असे स्पष्ट करण्यात आले.
संयुक्त निवेदनाचे आव्हान
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला विरोध करण्याच्या संदर्भात सर्व जी-20 च्या सर्व सदस्य देशांमध्ये एकवाक्यता घडवून आणणे आणि तसे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करणे हे आव्हानात्मक काम आहे, याची अमेरिकेला जाणीव आहे. कारण रशिया हा देखील जी-20 चा सदस्य देश आहे. त्यामुळे या संबंधात अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत, असे व्हाईटहाऊसने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या पत्रकारांचा प्रश्न
बायडेन यांच्या भारत आणि त्यानंतरच्या व्हिएतनाम या देशांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासह अमेरिकेचे पत्रकारही येणार आहेत. त्यांच्या पत्रकारितेवर या दौऱ्यात बंधने आणण्यात आली तर काय या प्रश्नावर त्यांनी अमेरिकन पत्रकारांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन केले.









