पहिल्यांदाच 11 सदस्य देशांची शिखर परिषद होणार
वृत्तसंस्था/ रिओ डी जानेरो
ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले आहेत. ब्रिक्स देशांची 17 वी शिखर परिषद ब्राझीलच्या प्रसिद्ध रिओ डी जानेरो शहरात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत मोदी बाराव्यांदा सहभागी होत आहेत. यावेळी ब्रिक्स शिखर परिषदेचा अजेंडा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) योग्य वापर, हवामान कृती, जागतिक आरोग्य यासारखे मुद्दे उपस्थित होणार आहेत. तसेच भारत ब्रिक्स शिखर परिषदेत सीमापार दहशतवादाबद्दलच्या आपल्या चिंता पुन्हा व्यक्त करू शकतो. यंदा एकूण 11 देशांचे प्रतिनिधी या शिखर परिषदेत सहभागी होणार असून याचदरम्यान मोदी अनेक सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चादेखील करतील.
दोन्ही देशांमधील व्यापार संबंध लक्षणीयरित्या वाढत असतानाच पंतप्रधान मोदींचा ब्राझील दौरा होत आहे. मोदींचा ब्राझील दौरा तीन दिवसांचा आहे. यादरम्यान ते दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर राजधानी ब्राझिलियालाही भेट देतील. येथे त्यांची राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांच्याशी द्विपक्षीय बैठक होईल. भारत ब्राझीलला आकाश संरक्षण प्रणाली, गस्ती जहाजे विकण्याबाबत चर्चा करू शकतो. तसेच स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडीच्या व्यवस्थापनाबाबत दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ब्राझीलने फ्रेंच पाणबुड्या देखील खरेदी केल्या आहेत. पंतप्रधान मोदी जी-20 शिखर परिषदेसाठी ब्राझीलमध्ये असताना ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा आणि पंतप्रधान मोदी यांनी 2,000 कोटी रुपयांचे व्यवसाय लक्ष्य ठेवले होते. या व्यवहाराचा आढावा घेऊन त्यावर आता अधिक भर दिला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
ब्रिक्स म्हणजे काय?
ब्रिक्स हा 11 प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा गट आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका यांच्यासोबतच इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती (यूएई), सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. या देशांमधील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सहकार्याला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे.









