काँग्रेसची निवडणूक रणनीती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
विधानसभेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाने आपली रणनीती आखली असून याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर अधिक जोर न देण्याची योजना आखली गेली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या दोनच मुद्द्यांवर जोरदारपणे प्रहार करणे टाळणे आवश्यक असणार असल्याचे मत काँग्रेसच्या वरिष्ठांकडून व्यक्त केले जात आहे. याउलट काँग्रेसने आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये भाजप सरकारच्या अयशस्वी योजनांबाबत जनतेमध्ये आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या 40 टक्के कमिशनचा मुद्दा त्याचप्रमाणे वाढती महागाई या मुद्द्यांवरच जास्तीत जास्त भर द्यावा, असे सुचविण्यात आले आहे.
काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीमध्ये 124 उमेदवारांची घोषणा केली होती. सदरचे उमेदवार आता निवडणुकीच्या प्रचारासाठी सिद्ध झाले असून त्यांना काँग्रेसने वरीलप्रमाणे सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी आणि हिंदुत्व यावर थेटपणे आरोप करणे टाळायला हवे. मोदी आणि हिंदुत्व यांना मानणारा एक मोठा समूह असल्याने त्याला दुखावण्याचा काँग्रेसचा इरादा नसल्याचे यावरून स्पष्ट होते आहे.
गेल्या वर्षभरामध्ये काँग्रेस सावधगिरीने विविध मुद्द्यांबाबत आवाज उठविताना दिसत आहे. जातीय राजकारणाबाबत कोणत्याही वादग्रस्त बाबीला तोंड फुटणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. काँग्रेसने सरकारच्या 4 टक्के ओबीसी गटाकरिताच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही. मुस्लीम समाजाला असणारे हे आरक्षण भारतीय जनता पक्षाने ओबीसी गटाला दिलेले असले तरी याबाबत काँग्रेसने सावध पवित्राच टीका करताना घेतला आहे. तसे किंबहुना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांना सांगितले जात आहे, असेही समजते.









