अळणावर, घटप्रभा, गोकाकचा समावेश
बेळगाव : मोठ्या रेल्वेस्थानकांसोबतच लहान रेल्वेस्थानकांचाही विकास करण्याचा प्रयत्न अमृत भारत स्टेशन्स योजनेतून केला जाणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील अळणावर, घटप्रभा, गोकाक रोड या रेल्वेस्थानकांचा या योजनेत समावेश झाला असून रेल्वेस्थानकांना आधुनिक रूप दिले जाणार आहे. देशातील 1275 रेल्वेस्थानकांना नवे रूप दिले जात आहे. अमृत भारत स्पेशल योजनेतून लहान रेल्वेस्थानकांवर अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण, प्रतीक्षा कक्ष, उत्तम शौचालय, लिफ्ट व सरकते जिने, मोफत वायफाय, किसोक केंद्र यासह इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत. अळणावर रेल्वेस्थानकासाठी 17 कोटी 2 लाख, घटप्रभा रेल्वेस्थानकासाठी 18 कोटी 2 लाख तर गोकाक रोड रेल्वेस्थानकासाठी 17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील या तिन्ही रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, लोंढा या मोठ्या रेल्वेस्थानकांसोबतच आता अळणावर, घटप्रभा व गोकाक रोड रेल्वेस्थानकांचेही नूतनीकरण लवकरच केले जाणार आहे.









