गेल्या दशकात जग खूप बदलले आहे. लोकांनी प्रत्येक उद्योगातील घडामोडी पाहिल्या आहेत. यामुळे एका नवीन आधुनिक युगाची सुरूवात झाली आहे. हे आधुनिक जग 1900 च्या दशकातील जगापेक्षा खूप वेगळे आहे. जग केवळ तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेले नाही, तर जगभरातील सामाजिक-सांस्कृतिक समस्यांमध्ये लक्षणीय बदल पहायला मिळत आहेत. जगभर होत असलेल्या क्रांतीमुळे, लोक संवेदनशील सामाजिक समस्यांबद्दल हळूहळू चर्चा करू लागले आहेत ज्याकडे अन्यथा दुर्लक्ष केले जायचे.
नवीन समाजात आपण पाहिलेला सर्वात मोठा बदल म्हणजे शिक्षणातील तंत्रज्ञानाचा सहभाग. आज, अनेक स्रोत आणि व्यासपीठे आहेत ज्याद्वारे शिक्षण मिळू शकते. ते आता शाळा-कॉलेजच्या चार भिंतींपुरते मर्यादित राहिलेले नाही. या सर्वांमुळे, लहान मुलांना लहानपणापासूनच विविध प्रकारचे ज्ञान मिळत आहे. जागतिकीकरणामुळे बऱ्याच सामाजिक आणि भावनिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. अशा विषयांबद्दल जागरूकता वाढल्यामुळे आजकालची पिढी नाजूक विषयांकडेसुद्धा मोकळ्या दृष्टिकोनाने बघते आणि त्याबद्दल बरीच माहिती देखील त्यांच्याकडे आहे जी मागील पिढीकडे कदाचित नसेल.
अशावेळेला, जेव्हा जगात एवढे बदल घडत आहेत, तेव्हा एक महत्त्वाचा बदलदेखील घडायला हवा आणि तो म्हणजे पालकत्वाची शैली. भारतीय संस्कृती ही कौटुंबिक मूल्ये आणि ज्येष्ठांचा आदर करण्याविषयी आहे. या पदानुक्रमामुळे दोन पिढ्यांमध्ये एक विशिष्ट फूट निर्माण होते. पूर्वी पालकांची आज्ञा पाळणे सामान्य होते, परंतु हल्ली मुले जुन्या परंपरा आणि विश्वासांवर प्रŽ विचारू लागली आहेत. पूर्वी पालकांशी मोकळेपणाने संवाद होत नसे पण आजकाल पालकांनी त्यांचा मुलांसोबत मोकळेपणाने संवाद साधणे ही काळाची गरज झाली आहे. लहानपणापासूनच मुलांना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच पालकांनी स्वत:हून त्यांच्या मुलांनी स्वतंत्रपणे या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांच्याशी या विषयांबद्दल रचनात्मक संभाषण करणे महत्त्वाचे आहे. यासह पालकांनी त्यांचे मूल किती तंत्रज्ञान वापरत आहे याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे आज जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु म्हणूनच, त्याच्या जोखमींबद्दल जागरूक राहणे आणि इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल मुलांना शिक्षित करणे खूप महत्त्वाचे आहे.
आधुनिक पालकत्व मुलांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासावर भर देते. भावनिक बुद्धिमत्ता व्यक्तींना त्यांच्या भावना प्रभावीपणे समजून घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यास सक्षम करते, तसेच इतरांशी सहानुभूतीने वागायला शिकवते. लहानपणापासून भावनिक बुद्धिमत्तेचे संगोपन केल्याने संवाद कौशल्य, संघर्ष निराकरण क्षमता आणि मनोबल वाढते. भावनांबद्दल मोकळ्या चर्चेला प्रोत्साहन देणे आणि सामना करण्याची यंत्रणा शिकवणे, मुलांना वाढत्या मागणी असलेल्या जगात तणाव आणि चिंता यांचा सामना करण्यास सक्षम करते. बरेच पालक या सगळ्यांपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यावर भरपूर नियंत्रणे लावतात. नियंत्रणे असणे गरजेचे जरी असले तरी मुलांना चुका करण्याची आणि त्यातून काय शिकले पाहिजे याची मोकळीक देणे गरजेचे आहे. तरच पुढे जाऊन ती स्वतंत्र व्यक्ती बनू शकतील.
आधुनिक पालकांनी पारंपरिक मुलगा आणि मुलगी या भूमिकांच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. पालकांनी आज समाजात मुला मुलींच्या भूमिकांबद्दल असलेल्या पूर्वग्रहांना आव्हान दिले पाहिजे आणि सर्व मुलांना त्यांच्या स्त्रीत्व आणि पुऊषत्व ओळखीची पर्वा न करता समान संधी आणि समर्थन प्रदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांना ते कोण आहेत यासाठी स्वीकारलेले आणि मूल्यवान वाटते अशा वातावरणाला प्रोत्साहन देऊन, पालकत्व अधिक न्याय्य आणि दयाळूपणे हाताळून समाजासाठी योगदान दिले पाहिजे.
शैक्षणिक यश महत्त्वाचे असले तरी, आधुनिक पालकांनी मुलांमध्ये सर्जनशीलता आणि गंभीर विचारांचा ऊहापोह करण्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. कलात्मक अभिव्यक्ती, कल्पनारम्य खेळ आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणे हे सर्वांगीण विकासास हातभार लावते आणि आजच्या सतत बदलणाऱ्या नोकरीच्या बाजारपेठेतील आव्हानांसाठी मुलांना तयार करते.
आधुनिक पालकांनी मुलांसोबत पूर्णपणे उपस्थित राहण्याच्या सरावावर भर दिला पाहिजे. विचलनाने भरलेल्या जगात, मुलांसाठी भरपूर वेळ समर्पित केल्याने पालक-मुलाचे बंध मजबूत होतात आणि मुक्त संवादासाठी सुरक्षित वातावरण मिळते. सजग पालकत्व पालकांना त्यांच्या मुलांच्या गरजा, आकांक्षा आणि आव्हाने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम करते, ज्यामुळे त्यांना अधिक आधार देणारे आणि पोषण करणारे वातावरण मिळते.
जगाला पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि आधुनिक पालकत्वाने मुलांमध्ये पर्यावरणीय चेतना जागृत करण्याचे महत्त्व मान्य केले पाहिजे. शाश्वत पद्धती शिकवणे, निसर्गाच्या मूल्यावर जोर देणे आणि जबाबदारीने पर्यावरण पूरक वागण्यास प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. स्वयंशिस्त फार गरजेची आहे.
आजच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या जगात, आधुनिक पालकत्व समाजाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ‘डिजिटल लँडस्केप’चा उपयोग करून, भावनिक बुद्धिमत्तेला चालना देऊन, सर्वसमावेशकतेला चालना देऊन आणि सांस्कृतिक जागऊकतेला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज झाली आहे. त्याच बरोबर सर्जनशीलतेसह शैक्षणिक समतोल साधून आणि लवचिकता विकसित करून, आधुनिक पालक त्यांच्या मुलांना सतत बदलत्या जगात भरभराट होण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज करण्यास मदत करू शकतात.
जर सजग पालकत्वाचे महत्त्व सर्वांनी समजावून घेतले तर ते पालक-मुलांच्या संलग्नतेला प्रोत्साहन देऊन, पर्यावरणविषयक जागरूकता अधिक शाश्वत करू शकते आणि संपूर्ण जगाच्या भविष्यालादेखील प्रोत्साहन देऊ शकते. पण हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी प्रथम पायरी आहे आपल्या मुलांना समजून घेण्याची आणि त्यांना जसे आहेत तसे स्वीकारण्याची. नवीन पिढीच्या वेदना जरी आधुनिक पालकांनी अनुभवल्या नसल्या, तरी आजची पिढी रोज नवनवीन आर्थिक, सामाजिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जात आहे. अशावेळेला आपल्या मुलांना व बदलत्या समाजाला स्वीकारून आधुनिक पालकत्वावर थोडा भर दिला, तर येणारी पिढी अधिक यशस्वी, आनंदी आणि क्रांतिकारक बनायला वेळ लागणार नाही!
-श्राव्या माधव कुलकर्णी