नोस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी हा अनेकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. जगात कोणतीही मोठी किंवा अनपेक्षित घटना घडली, की या घटनेची भविष्यवाणी नोस्ट्रॅडेमसने शेकडो वर्षांपूर्वी करुन ठेवली होती, असे म्हणण्याची जणू प्रथाच पडली आहे. नोस्ट्रॅडेमस नामक भविष्यवेत्ता फ्रान्समध्ये 1503 ते 1566 या काळात होऊन गेला होता. त्याने साऱ्या जगाचे पुढच्या 2 हजार वर्षांचे भविष्य लिहून ठेवले आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्याने वर्तविलेले भविष्य खरे ठरले आहे, असेही अनेकांचे प्रतिपादन आहे. अर्थात, याचे विरोधकही आहेतच.
सध्या ब्रिटनमध्ये एका नव्या नोस्ट्रॅडेमची चर्चा आहे. त्याने वर्तविलेली अनेक भविष्ये खरी ठरत आहेत, अशी त्याची ख्याती सध्या पसरलेली आहे. काही दिवसांपूर्वी एक तेलवाहू नौका आणि एक मालवाहू नौका यांची टक्कर झाली होती. ही भविष्यवाणी या नव्या नोस्ट्रॅडेमसने आधीच वर्तविली होती. ती तंतोतंत खरी झाल्याने तो अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे नाव व्रेग हॅमिल्टन-पार्कर असे आहे. सध्या सुरु असलेल्या मार्च महिन्यात कोणकोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार, याची भविष्यवाणी त्याने 4 मार्चलाच केली होती. त्याचा या संदर्भातला युट्यूब व्हिडीओही प्रसिद्ध झाला आहे. तेलवाहू नौकेसंबंधीचे त्याचे भविष्यकथन त्यानंतर सातच दिवसांनी खरे झाल्याचे आढळून आले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर निवडणूक प्रचार काळात प्राणघातक हल्ला होणार आहे, हे भविष्यही त्याने वर्तविले होते. तेही त्यानंतर दोनच दिवसांमध्ये खरे ठरल्याचे दिसून आले. पार्कर त्यांच्या तरुण वयात भारतात आले होते. भारतात त्यांनी नाडी ज्योतिष आणि इतर प्रकारांच्या ज्योतिषांचा अभ्यास केला होता. सध्या त्यांच्या भविष्यवाण्या नोस्ट्रॅडेमसप्रमाणेच गाजत आहेत.









