कळंबा / सागर पाटील :
सानेगुरुजी वसाहतीतील सूर्यवंशी कॉलनी येथे पालिकेच्या आरक्षित जागेत महिलांसाठी खास आधुनिक जिम उभारणीचे कामे सुरू आहे. तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या जिमचे काम अंतिम टप्यात आहे. यामुळे महिलांना आरोग्य संवर्धनासोबतच मनोरंजन, विरंगुळा आणि सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि सुसज्ज ठिकाण उपलब्ध होणार आहे.
- दहा वर्षांची रखडपट्टी प्रस्ताव ते प्रत्यक्ष उभारणी
२०१३ साली महिलांसाठी स्वतंत्र जीम उभारण्याचा प्रस्ताव पालिका सभेत मंजूर झाला. त्यावेळी या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचा विशेष निधीही उपलब्ध झाला होता. त्यापैकी ४३ लाख रुपये इमारत उभारणीसाठी खर्च केले. माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, त्यानंतर पालिकेतील राजकीय उलथापालथ, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पाटील-महाडिक गटातील अंतर्गत राजकारण, निधीअभावी व प्रशासनिक अडचणींमुळे जीममचे काम दहा वर्षे रखडले. माजी नगरसेवक मनिषा कुंभार यांनीही यासाठी पाठपुरावा केला. २०२४ मध्ये ‘अमृत योजना’ आणि आमदार मदार निधीतून सुमारे ९० लाखांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाल्याने जिमच्या उभारणीला पुन्हा वेग आला. कामाचा ताबा मिळाल्यानंतर बांधकाम, आंतररचना, उपकरण खरेदी आणि पूरक सुविधा उभारणीसाठी गतीने काम सुरू असल्याचे ठेकेदार मनोज माने यांनी सांगितले. आज जिम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती औपचारिकपणे महिलांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ही जिम केवळ व्यायामापुरती मर्यादित नसून, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी डिझाइन केली आहे. प्रेशर वॉकर, चेस्ट प्रेशर, सायकलिंग, पुलीज, डंबेल्स, एब्डॉमिनल बेंचसारखी अत्याधुनिक उपकरणे बसवली आहेत. याशिवाय, स्टीम बाथरूम, स्वच्छतागृह, योगा रुम, झुंबा डान्स रुम, वाचनालय, लहान मुलींसाठी खेळणी व वाचनाची सुविधा, तसेच ओपन जीमचा समावेश आहे.
- महिलांसाठी नवे पर्व
येथे येणाऱ्या महिलांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्य सुधारण्याची आणि तणाव कमी करण्याची संधी मिळेल. योगा, झुंबा आणि वाचनालय यांसारख्या सुविधा महिलांना सर्वांगीण विकासाच्या दिशेने प्रेरित करतील. लहान मुलींसाठी खेळणी व वाचनालय असल्याने मातांसाठीही हे केंद्र सोयीस्कर ठरेल. तसेच महिलांची आरोग्यविषयक जागरूकता अन् जीवनशैलीची सवय लागेल. विशेषतः, घरकाम, नोकरी व कुटुंब या तिहेरी जबाबदाऱ्या पेलणाऱ्या महिलांसाठी हा बदल सकारात्मक ठरेल.
या केंद्रामुळे महिलांना व्यायामासह मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळेल. राज्यात आदर्शवत अशी खास महिलांसाठी उभारलेल्या या जीममुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल.
– कृष्णात जाधव, नागरिक
उपनगरातील आधुनिक जीमचे दर महाग असतात आणि महिलांना तिथे संकोच वाटतो. मनपाच्या स्वतंत्र महिला जीममुळे आरोग्य सुधारेल आणि सुरक्षित वातावरणात व्यायाम करता येईल.
– उज्ज्वला पाटील, नागरिक कृपासिंधू नगरी
निव्वळ श्रेयवाद आणि राजकीय अंतर्गत कलहामुळे जीमचे काम दहा वर्षे रखडले. आता मात्र ती लवकर पूर्ण होऊन महिलांच्या सेवेत यावी, ही अपेक्षा आहे
– कुलदीप सावरतकर, उद्योजक








