प्रतिनिधी/ पुणे, मुंबई
पुढील आठवडाभर म्हणजेच शनिवार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, विदर्भात जोरदार मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषत: धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैऋत्येला 700 किमी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर पश्चिमेकडे ओमान-येमेन देशकडेकडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते.
आग्नेय बंगालच्या उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे आज मध्य बंगालच्या उपसागारात मार्गक्रमण होवून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर व 28 तारखेला चक्रीवादळ व 28 तारखेलाच तीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून आंध्र किनारपट्टीवरील मछलीपटणम व कलिंगपटणम या शहरांच्या मध्यावरील काकींनाडा शहराच्या आसपास धडकण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, असे हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
या काळात किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असून, झोत 65 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दहाणू ते श्रीवर्धन आणि मुरगावपर्यंतच्या सर्व बंदरांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेला द्रोण सध्या मुंबईपासून सुमारे 760 किलोमीटर नैऋत्येस आहे. तो गेल्या सहा तासांत सुमारे 13 किमी प्रतितास वेगाने दक्षिण-पश्चिम दिशेने सरकला आहे. पुढील 24 तासांत तो दक्षिण-पश्चिम दिशेने सरकणार असून, त्याचा परिणाम कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दिसून येईल. 26 ते 30 ऑक्टोबरदरम्यान या भागात मध्यम ते व्यापक पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.









