दक्षिण सोलापूर / बिसलसिद्ध काळे :
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून आधुनिक व शाश्वत शेतीची वाट धरावी. या भागात दोन नद्या असून त्यांचा योग्य वापर करून समृद्ध शेतीची संकल्पना राबवावी, असे आवाहन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. येथील 38 गावांमध्ये सर्व सण-उत्सव शिस्तबद्धपणे साजरे होत असून, भविष्यात या गावांना मॉडेल गाव म्हणून विकसित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
बुधवारी (ता. १३ ऑगस्ट) दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर, ग्राम सुरक्षा दल किट वाटप, वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते गणेश प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर ग्राम सुरक्षा दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांना किट्सचे वाटप करण्यात आले. भव्य रक्तदान शिबीर तसेच वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) दीपक चव्हाण, अप्पर तहसीलदार सुजीत नरहरी, मंद्रूपच्या सरपंच अनिता कोर, माजी पंचायत समिती सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, निंबर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे, भाजप जिल्हा चिटणीस यतीन शहा, रमेश आसबे, संजय गायकवाड, सिध्देश्वर ब्लड बँकेचे डॉ. हरिश्चंद्र गलियाल, अजय जाधव, सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. राहुल वाघमारे, डॉ. समीरा पटेल, महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे डॉ. शैलेश पटणे, जनसंपर्क अधिकारी संतोष थोरात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जवाहर मोरे यांनी केले, तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मानले.
या कार्यक्रमाला मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








