वार्ताहर /बाळेकुंद्री
‘उदं ग आई उदं’ च्या जयघोषात, ढोल व बॅन्ड पथकाच्या गजरात, रिमझिम पावसात, भंडाऱ्याची उधळण करत तल्लीन होऊन नाचणारे भाविक अशा उत्साही वातावरणात बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोदगा येथील लक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस असल्यामुळे मोदगा परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. सकाळपासूनच देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबचलांब रांगा लावल्या होत्या. महिला व पुरूष अशा स्वतंत्र रांगा केल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले होते. मंदिराभोवती महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तत्पूर्वी सकाळी देवीच्या मंडपात आकर्षक रांगोळ्या रेखाटलेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास आरतीनंतर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी विधीपूर्वक पूजाअर्चा झाल्यानंतर उत्सवमूर्ती (होन्नाट) ला प्रारंभ झाला. यावेळी उत्सवमूर्तीची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. यावेळी बेळगाव-बागलकोट मार्गावर भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.









