केवळ नाचगाणी अन् जल्लोष करण्याचा प्रकार
पारंपरिक भारतीय विवाह हा एकप्रकारे उत्सवच असतो. हळद लावण्याचा विधी, वरात, वधू-वर, नाचगाणे आणि जेवणाची पंगत इत्यादी अनेक गोष्टी लोकांना आकर्षित करणाऱ्या असतात. अमेरिकेतील कोलंबिया, ऑरेगॉन, न्यूयॉर्क, टेक्सास, स्टॅनफोर्ड, टोरंटो यासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधील विद्यार्थी आता याच भारतीय विवाहपद्धतींचा आनंद घेत आहेत. तेथील विद्यार्थी आता मॉक (नकली) विवाह आयोजित करत आहेत.
शेरवानी परिधान करून वर झालेला विद्यार्थी सजविण्यात आलेल्या अश्वावरून वरात घेऊन येतो. विद्यार्थी वऱ्हाडी म्हणून सामील होतात, ढोलाच्या वादनावर नृत्याचा आनंद घेतात. त्यानंतर सर्वजण कथित वधूच्या ठिकाणी पोहोचतात. चमकणारा पोशाख आणि दागिने परिधान करून वधू झालेली विद्यार्थिनी येते. वधू अन् वर स्टेजवर बसतात, सर्व विधी पार पाडले जातात, विद्यार्थी याचा आनंद घेत जेवल्यानंतर परत निघून जातात.
पूर्ण उत्तर अमेरिकेत दक्षिण आशियाई विद्यार्थ्यांदरम्यान मॉक विवाहाचा ट्रेंड वाढला आहे. वधू अन् वर असे विद्यार्थी असतात, जे कधीच परस्परांना भेटलेले नसतात. ते केवळ भूमिका पार पाडत असतात. अनेकदा तर हे विद्यार्थी वेगवेगळ्या विद्यापीठांमधील असतात.
पाकिस्तान स्टुडंट असोसिएशन कोलंबिया विद्यापीठासोबत मिळून मॉक विवाह करणार असल्याचे कळल्यावर ऑरेगॉन विद्यापीठातील नासिरने अर्ज केला होता. लोक एकदाच विवाह करतात. परंतु मला तर विवाहाचा सराव करण्याची संधी मिळत होती. या विवाहात श्वेतवर्णीय मित्र देखील सामील होते. त्यांना विधी समजत नसले तरीही ते त्यांचा आनंद घेत होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मॉक विवाहात चार वधू अन् चार वर सामील असतात असे नासिरने सांगितले.

न्यूयॉर्क इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची सुमैया मुहित बंगाली स्टुडंट असोसिएशनद्वारे मॉक विवाह करविते. विवाहासाठी वधू अन् वराची निवड एक महिन्यापर्यंत चाललेल्या प्रक्रियेतून होते. यात भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातील 500 विद्यार्थी सामील झाले होते. आता मॉक विवाहाशी कॅम्पसबाहेरील आशियाई लोकांनाही जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुमैया सांगते.
दक्षिण आशियाई लोकांचे प्रभुत्व
अमेरिकेच्या अनेक महाविद्यालयांमध्ये आता मॉक विवाह हा वार्षिक उपक्रम ठरला आहे. यात दक्षिण आशियाच्या विविध क्षेत्रांमधील विद्यार्थी परस्परांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेतात. सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याऐवजी अमेरिकेच्या कॅम्पसमध्ये दक्षिण आशियाई समुदायाचे प्रभुत्व म्हणून याकडे पाहत असल्याचे उद्गार वेस्टर्न कॉलेज कॅम्पसच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. अपर्णा कपाडिया यांनी काढले आहेत.









