ऑक्सिजन, औषधे, कोरोना वॉर्ड आदींची होणार तपासणी
पणजी : कोरोना ऊग्णांची वाढती संख्या आणि त्यास तोंड देण्यासाठी असलेली एकंदरित तयारी तपासून पाहाण्याकरीता आज सोमवार दि. 10 एप्रिल रोजी राज्य सरकारतर्फे ‘मॉक ड्रिल’चे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या देशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आज सोमवारी सर्व राज्यांना मॉक ड्रिल करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार गोव्यातही त्याचे पालन आज सोमवारी होणार आहे. या ‘मॉक ड्रिल’मध्ये आरोग्य अधिकारी, सरकारी हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रे या ठिकाणी भेटी देऊन तेथील एकूण तयारीचा अहवाल तयार करणार आहेत. ऑक्सिजन साठा, औषधे, कोरोना वॉर्ड व इतर आरोग्य सेवा सुविधा यांची पाहणी त्यात होणार आहे. त्याद्वारे काय कमी आहे, त्रुटी आहेत याचाही विचार या सर्वेक्षणातून होणार असून त्याचा एक समग्र अहवाल आरोग्य मंत्रालयास पाठवण्यात येणार आहे. कोरोना ऊग्णांसाठी उपलब्ध असलेले वॉर्ड व इतर आरोग्य सुविधा याची माहिती या ‘मॉक ड्रिल’मधून प्राप्त होणार आहे. यापूर्वी 27 डिसेंबर 2022 मध्ये अशा प्रकारे ‘मॉक ड्रिल’ करण्यात आले होते. आता हे दुसरे ‘मॉक ड्रिल’ असून त्यात राज्याची आरोग्य सेवा कोरोनाचा सामना करण्यासाठी किती सक्षम आहे हे समोर येणार आहे. बहुतेक सर्व राज्यात कोरोनाचे ऊग्ण वाढत असल्याने हे ‘मॉक ड्रिल’ करण्यात येत आहे.









