ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाश्चिमात्य देश रशियाला नष्ट करण्याचा कट रचत आहेत. त्या देशांनी आता सीमारेषा ओलांडली आहे, असा आरोप करत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज देशात लष्करी जमवाजमव करण्याचे आदेश दिले आहेत. रशियन न्यूज एजन्सी आरटीने पुतीन यांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
आरटीच्या म्हणण्यानुसार, पाश्चिमात्य देश रशियाला नष्ट करु पाहत आहेत. देशबांधवांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पुतीन यांनी आज देशात लष्करी जमवाजमव करण्याचे आदेश दिले आहेत. तीन लाख सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. यावेळी पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांनाही इशारा दिला आहे. ‘युक्रेन वॉर’ या विशेष लष्करी मोहिमेचे आमचे ध्येय कायम आहे. युक्रेनचे लुहँस्क पीपल्स रिपब्लिक (LPR) मुक्त करण्यात आले असून, डोनेस्तक पीपल्स रिपब्लिक (DPR) हा देशही अंशतः मुक्त करण्यात आला आहे, असे पुतीन यांनी सांगितले.
अधिक वाचा : पत्राचाळ प्रकरणाला नवे वळण, राऊतांनी बेहिशेबी पैसा चित्रपट, मद्य कंपनीत गुंतवला
दरम्यान, प्रादेशिक एकात्मतेला धोका निर्माण झाल्यास रशिया उपलब्ध सर्व साधनांचा वापर करेल, असा इशारा पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आहे. पुतीन यांनी आपल्या देशाच्या लष्करी आघाडीच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून, ती आजपासून अमलात येणार आहे.