दहा जणांचे मोबाईल लांबविले
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत पाकिटमार व मोबाईल चोरांनी शुक्रवारी दिवसभर धुडगूस घातला होता. दिवसभरात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या सुमारे दहाहून अधिक जणांचे मोबाईल पळविण्यात आले आहेत. बाजारपेठेत गर्दी असली की साहजिकच गुन्हेगार सक्रिय होतात. गेल्या आठवड्याभरापासून खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, कडोलकर गल्ली परिसरात खरेदीसाठी गणेशभक्तांची तुडुंब गर्दी झाली आहे. शुक्रवारी दिवसभर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या नेहमीपेक्षा अधिक होती.
मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3 व खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 6 जणांचे मोबाईल पळविण्यात आले आहेत. संबंधितांनी पोलीस स्थानकात येऊन तक्रार केली असून नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल चोरांचा शोध घेण्यात येत आहे. बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा वावरही वाढविण्यात आला होता. गस्तीच्या वाहनांबरोबरच गणवेशातील व साध्या वेशातील पोलीस गस्त घालत होते. तरीही पोलिसांना चकवून गुन्हेगारांनी सुमारे दहा जणांचे मोबाईल चोरले आहेत. गेल्यावर्षी 1 नोव्हेंबर रोजी शंभरहून अधिक जणांचे मोबाईल चोरण्यात आले होते.









