कर्नाटकातील तिघांना झुवारीनगरात अटक : मुके, बहिरे असल्याचे सांगून साधायचे संधी,तब्बल 7.50 लाखाचे 23 मोबाईल सापडले,मुके, बहिरे असल्याचे बनावट दाखलेही जप्त
पणजी : पणजी पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन संशयितांना झुवारीनगर येथे अटक केली असून त्यांच्याकडून 7 लाख 50 हजार ऊपये किमतीचे 23 मोबाईल जप्त केले आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वालसन यांनी दिली. हे चोरटे आपण मुके, बहिरे असल्याचे नाटक करून चोरी करायचे. त्यांच्याकडून मुके बहिरे असल्याचे बनावट दाखलेही जप्त करण्यात आले आहेत. लोकांनी सावधगिरी बाळगावी व अशा चोरट्यांबाबत कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन वालसन यांनी केले आहे.
काल मंगळवारी पणजीतील पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वालसन बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पणजी एसडीपीओ सुदेश नाईक, पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर, पणजी पोलीस स्थानकाची टीम उपस्थित होती. अटक केलेल्या संशयितांमध्ये एल. के. लक्ष्मण (26), संदीप नागेंद्रप्पा सिद्दनामट्टी (30) व संतोष भोवी (25) यांचा समावेश आहे. तिघेही कर्नाटकातील शिमोगा येथील असून गोव्यात ते झुवारीनगर येथील झोपडपट्टीत राहत होते. दोन दिवसांपूर्वी सुरज चित्रसेन यांनी आपला मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीबाबत शोध घेत असताना या मोबाईल चोरट्यांचा सारा प्रकार उघडकीस आला. हे चोरटे मुके आणि बहिरे असल्याचे नाटक करुन मदतीसाठी शहरातील मुख्य ठिकाणी फिरत असायचे. लोकांची सहानुभूती मिळवायचे आणि संधी मिळाली की हातसाफ करून पसार व्हायचे. ज्या ठिकाणी विविध पाळ्यांमध्ये काम करणारे कामगार असतात, त्या आस्थापनाच्या ठिकाणी हे चोरटे रात्रीच्यावेळी थांबायचे. त्या आस्थापनातील कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करून तिथेच झोपतात, नंतर एखादा कामगार पहाटे निघून जातो. त्यावेळी त्या खोलीचे दार उघडेच राहते, याची संधी घेऊन हे चोरटे त्या खोलीत जाऊन तिथे चार्जिंगला लावलेले मोबाईल घेऊन पोबारा करायचे, अशी त्यांची चोरी करण्याची पद्धत होती.









