ट्रेडिंगच्या माध्यमातून भरमसाट परतावा देण्याचे दाखविले आमिष : सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रकार सुरूच
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रकार सुरूच आहेत. टेडिंगच्या माध्यमातून सावजांना ठकवण्याचे प्रकारही थांबता थांबेनात. चिकोडी येथील एका मोबाईल दुकानदाराला 18 लाख 56 हजार रुपयांना सायबर गुन्हेगारांनी ट्रेडिंगच्या माध्यमातून ठकवले आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे प्रकार जुनेच आहेत. वारंवार फसवणुकीच्या घटना घडूनही पुन्हा सावज त्यांच्या गळाला लागतात. खासकरून सुशिक्षितच सायबर गुन्हेगारांकडून लुटले जात आहेत. चिकोडी येथील सतीश नेजे नामक एका मोबाईल दुकानदाराची फसवणूक झाली आहे.
यासंबंधी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. जिल्हा सीईएनचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी, पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर आदी अधिकारी पुढील तपास करीत आहेत. सायबर गुन्हेगारांचे अकाऊंट तपासण्यात येत आहे. मोबाईल दुकानदार सतीश यांच्या फेसबुकवर ट्रेडिंग संबंधीचा एक लिंक आला. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तयार केलेल्या वॉट्सअप ग्रुपमध्ये ते सहभागी झाले. कोणत्या कंपनीत गुंतवणूक केल्यावर किती नफा मिळतो, याविषयीची माहिती देण्यात आली. भामट्यांवर विश्वास ठेवून सतीश यांनी सुरुवातीला दहा हजार रुपये गुंतवणूक केली.
दहा हजार रुपयांच्या बदल्यात लगेच त्यांना तीन हजार रुपयांचा परतावा मिळावा. त्यावेळी त्यांनी 50 हजार रुपये गुंतवणूक केली. त्याच्या बदल्यात 15 हजार रुपये परतावा मिळाल्यामुळे भामट्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास बसला. 3 लाख रुपयांची त्यांनी गुंतवणूक केली. त्याच्या बदल्यात 15 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात आले. सतीश यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. ती काढण्यासाठी आणखी 15 लाख रुपये जमा करावे लागणार. तरच ही रक्कम काढता येणार आहे, असे सांगण्यात आले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी एकूण 18 लाख 56 हजार रुपये भरले. तरीही त्यांचा परतावा मिळाला नाही. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.









