खानापूर : विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञासेतून झाला. ज्ञानासंबंधी शुद्ध प्रेम ही विज्ञानाची प्रेरणा आहे. असे मत निवृत्त प्राचार्य शशिकांत एस. पाटील यांनी व्यक्त केले. ते येथील श्री स्वामी वेवेकांनद शिक्षण सेवा सोसायटी संचलित श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या फिरते विज्ञान प्रयोगालय आणि आभासी प्रयोगातून विज्ञान प्रयोग कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन गोवा विज्ञान केंद्र पणजी, जिल्हा विज्ञान केंद्र गुलबर्गा, ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संशोधन केंद्र पुणे आणि पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, विज्ञान प्रयोगातून सिद्ध केले जाते. विज्ञान हा प्रगतीचा स्त्रोत्र आहे. विज्ञानाचे प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीतील सराती जाणणे, त्याचे रहस्य उलघडणे हे होय. विज्ञानात वापरण्यात येणाऱ्या फायद्याबद्दल माहिती देवून पाटील यांनी विज्ञानाचा उपयोग मानवी जीवनाच्या उत्क्रांतीवर कसा होतो. हे उदाहरण देऊन सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सेवा सोसायटीचे चेअरमन अॅड. चेतन मणेरीकर होते. याप्रसंगी ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी निसर्गातील प्रत्येक घडामोडीकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. शालेय जीवनापासून विज्ञानात अधिक रस आणि रुची दाखवून वैज्ञानिक होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे.
यावेळी गोवा विज्ञान केंद्राचे भूषण राऊत यांचे समयोचित भाषण झाले. व्यासपीठावर गुलबर्गा जिल्हा विज्ञान केंद्राचे लक्ष्मीकांत जमादार आणि भमरय्या बेळगमी, संस्थेचे सदस्य गोविंद शहापूरकर, सदानंद कपिलेश्वरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्याकडून वेगवेगळ्या विषयावर विज्ञान प्रयोगाची मांडणी करण्यात आली होती. पदवीपूर्व महविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांकडून रांगोळीच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण केले होते. प्राचार्य विनोद मराठे यांनी स्वागत केले. प्राचार्य पी. के. चापगावकर यांनी सूत्रसंचालन केले. रेखा यांनी आभार मानले.
तर विद्यार्थ्यांना तारांगण निरीक्षणाचा आनंद लुटता येईल
सोमवारी रात्री आभाळ स्वच्छ राहील तर तारांगण निरीक्षण दरम्यान आज सकाळी 10 च्या सत्रात आभासी प्रयोग एन. विज्ञान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम पहिल्यांदाच खानापूर तालुक्यात होत आहे. सोमवारी रात्री आकाश स्वच्छ राहिले तर विद्यार्थ्यांना तारांगण निरीक्षणाचा आनंद लुटता येणार आहे. अशी माहिती गुलबर्गा जिल्हा विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.









