टीव्ही देखील पाहता येत नाही , रिमोट कंट्रोलयुक्त खेळण्यांवरही बंदी
सद्यकाळ हा डिजिटल असून प्रत्येक कामासाठी लोक डिजिटल मीडियावर निर्भर आहेत. टीव्ही, रेडिओच नव्हे तर माणसांसाठी सर्वात आवश्यक बाब आता स्मार्टफोन ठरला आहे. स्मार्टफोनशिवाय एक मिनिटही राहणे अवघड वाटू लागते. अशा स्थितीत एका शहरात टीव्ही पाहता येत नाही, तसेच मोबाइलचा वापर करता येत नाही.

हे शहर अमेरिकेतील आहे. अमेरिकेतील या शहरात मोबाइल, टीव्ही आणि रेडिओवर देखील बंदी आहे. या उपकरणांचा वापर करणाऱयाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. या शहराचे नाव ग्रीन बँक असून हे अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनियाच्या पोकाहॉन्ट्समध्ये भागात मोडते. या शहरात सुमारे 150 लोक राहतात. परंतु या लोकांकडे कुठलाही टीव्ही किंवा मोबाइल नाही. यामागे विशेष कारण आहे.
टेलिस्कोप ठरले कारण
ग्रीन बँक सिटीत इलेक्ट्रॉनिक्स सामग्री बाळगण्यास मनाई आहे. या शहरात जगातील सर्वात मोठा स्टीयरेबल रेडिओ टेलिस्कोप आहे. याला ग्रीन बँक टेलिस्कोप या नावानेही ओळखले जाते. हा टेलिस्कोप अत्यंत मोठा असून तो एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी हलविता येतो. या टेलिस्कोपच्या डिशचा आकार एका फुटबॉल मैदानाइतका आहे. हा टेलिस्कोप 485 फूट लांब आणि 7600 मेट्रिक टन वजनाचा आहे.
बंदी घालण्याची आवश्यकता

हा विशाल आकाराचा टेलिस्कोप अमेरिकेच्या राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्राच्या वेधशाळेत आहे. याची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली होती. अंतराळातून पृथ्वीवर येणाऱया तरंगांचे तेथे वैज्ञानिक अध्ययन करतात. या भागात अनेक टेलिस्कोप असून ते गुरुत्वाकर्षणापासून कृष्णविवरांचे अध्ययन करत आहेत. ग्रीन बँक टेलिस्कोप अंतराळात 13 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील सिग्नलची पकडू शकतो. या टेलिस्कोपमुळेच येथे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर पडणारे तरंग अंतराळातून येणाऱया तरंगांवर प्रभाव पाडू शकतात. याचमुळे या उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे.









