सांगली / विनायक जाधव :
सध्या लोकांना मोबाईल आणि दुचाकीशिवाय चालत नाही. या दोन्ही वस्तू किंमती आहेत. पण याच वस्तूवर आता चोरट्यांची नजर पडली आहे. या दोन्ही वस्तूच्या चोरीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पोलीसही आता चक्रावून गेले आहेत. ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेत या दोन्ही वस्तूच्या चोरी होत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलीसांनी या विशेष एरियामध्ये आता लक्ष ठेवले आहे. त्याचठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पण तरीही मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढतच आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून मोबाईल आणि दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. सरासरी दररोज एक मोबाईल आणि एक दुचाकी चोरी केली जात आहे. भुरट्या चोरट्यांकडून हा प्रकार सातत्याने घडताना दिसत आहे. पोलीस ठाण्यात या चोरीची फिर्याद दाखल होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या शहरात सीसीटीव्हीचे मोठे जाळे पसरलेले असतानाही दुचाकी आणि मोबाईलची चोरी दिवसाढवळ्या सर्वांसमोर होत आहे. हे चित्र थोडे धक्कादायक आहे. त्यामुळे अशा चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीसांना विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे.
सांगली शहरात प्रत्येक दिवशी काही भागात आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले आहे. हे आठवडी बाजार साधारणपणे सांयकाळी पाच ते रात्री दहापर्यंत सुरू असतात. या आठवडी बाजारात सहजपणे मोबाईल लंपास केले जात आहेत. हे मोबाईल लंपास करणारे चोरटे हे अल्पवयीन आहेत. त्यामुळे जरी या चोरट्यांना रंगेहात पकडले तर इतर लोक लहान मुलगा आहे त्याला सोडून द्या म्हणून सांगतात आणि त्यातून हे चोरटे सहजपणे निसटतात. गेल्या काही दिवसापासून मात्र सातत्याने या घटना घडत असल्याने पोलीसांनी आता आठवडी बाजारावर वॉच ठेवण्याची मोहिम राबविली आहे. या बाजारात संशयितरित्या फिरणाऱ्यांना ते अडवून त्यांची चौकशी करताहेत. त्यामुळे अनेक बाजारातून हे चोरटे आता दिसेनासे झाले आहेत. पण तरीही पोलीस आणि नागरिकांची नजर चुकवून हे चोरटे चोरी करत आहेत.
आठवडी बाजारात साधारणपणे लोक भाजी खरेदी करत असताना आपला मोबाईल खिशात ठेवताना तो व्यवस्थित ठेवत नाहीत. हा मोबाईल पाठीमागील खिशात किंवा शर्टच्या वरच्या खिशात ठेवतात. भाजी खरेदी करताना गर्दी झाली की सहजपणे धक्का लागल्यावर हा मोबाईल इतरांच्या हाती येतो आणि मोबाईल मालकाला काही समजण्या आधीच लगोलग हा मोबाईल एकाकडून दुसऱ्याकडे असा लंपास झालेला असतो. पुरुषांच्या बाबतीत असे घडते तर महिलांच्या बाबतीतही असेच घडते. हा मोबाईल भाजीच्या पिशवीजवळ किंवा हातात तसेच पर्समधील उघड्या कप्यात ठेवला जातो. त्यामुळे हा मोबाईल चोरी करणे या चोरट्यांना सहजपणे जमते. नागरिकांनी आपल्या वस्तूची काळजी आणि सुरक्षितता घेतली तर या मोबाईलच्या चोऱ्या होण्याची शक्यता कमी आहे. पण ही सुरक्षितता घेतली जात नाही. त्यामुळेच या चोऱ्या वाढत चालल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही.
- दुचाकाची ठराविक ठिकाणावरूनच चोरी
सांगली शहरातील काही चौकातून तसेच वसंतदादा सर्वोपचार रुग्णालय याशिवाय अनेक रूग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या दुचाकी चोऱ्याच्या अनेक घटनाची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामध्ये या ठराविक चौकाचे आणि ठराविक रूग्णालयाच्या पार्किंगच्या जवळचे ठिकाण आहे. दुचाकीच्या डुप्लिकेट चाव्या सहजपणे तयार होत असल्याने या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच काही दुचाकीचे हँडललॉक सहजपणे तोडले जाते. त्याचे प्रात्याक्षिकही अनेकवेळा चोरट्यांनी पोलीसांसमोर दाखविले आहे. पण तरीही या दुचाकीचे हँडल अजूनही अत्यंत चांगल्या दर्जाचे तयार होत नाही. यामुळे या दुचाकी सहजपणे चोरी केल्या जात आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे येतात. पण लो-क्वॉलिटीचे सीसीटीव्ही असल्याने अनेक चोरटे स्पष्ट दिसत नसल्याने हे चोरटे सापडत नाहीत. पोलीसांनी ज्या परिसरात दुचाकी चोऱ्या होतात त्या परिसरातही गस्तीचे प्रमाण वाढविल्यास या चोऱ्याही कमी होवू शकतात.
याबरोबरच आता अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकीची चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात नोंदी आहेत. दुचाकी चोरटे पकडण्यात पोलीसांना यश येते पण सध्याच्या घडीला मात्र चोरी होणाऱ्या दुचाकीची संख्या १०० आणि चोरट्यांकडून पकडलेल्या दुचाकीची संख्या फक्त १० इतके हे विषम प्रमाण आहे. त्यामुळे या दुचाकी चोरट्यांना कसे अटक करायचे आणि त्यांच्याकडून या दुचाकी कशा जप्त करायच्या हाच पोलीसांसमोर प्रश्न आहे.
- लहान मुलांचा समावेश
जिल्हयात मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीमध्ये लहान मुलांचा समावेश करण्यात येत असल्याचे अनेक चोरीमधील सीसीटीव्ही फुटेजमधून लक्षात आले आहे. त्यामुळे चोरी करणारे सापडलेच तर ते अल्पवयीन असल्याचे सांगून त्यांना सहजपणे बाहेर काढता येवू शकते हा अंदाज करून अनेक चोरट्यांनी लहान मुलांचा या चोरीमध्ये सहभाग वाढविला आहे. त्यामुळे पोलीसांनी आता या लहानमुलांच्यावर विशेष लक्ष ठेवले आहे.








