पुणे / प्रतिनिधी :
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या कक्षाची तोडफोड करीत बुधवारी जोरदार आंदोलन केले.
वैद्यकीय शाखेत प्रवेश देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बनगिरवार (वय 54) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (8 ऑगस्ट) सायंकाळी अटक केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बुधवारी दुपारी वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात जमले. संतप्त कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. बनगिरवार यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन कक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते डॉ. अभिजीत मोरे म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी मेडीकल कॉलेजमध्ये एकूण 100 जागा आहे. त्यापैकी 85 जागा राज्य सरकारद्वारे मेरीटवर भरल्या जातात. 15 जागांचा इन्स्टिटय़ुशनल कोटा आहे. यात मॅनेजमेंट कोटा व एनआरआय कोटा यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोटा आहे आणि भ्रष्टाचाराचे हे कुरण आहे. मुंबई महानगरपालिकेची तीन वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि तेथील सर्व जागा या राज्यसरकारद्वारे मेरिटद्वारे भरल्या जातात. तेथे कोणताही मॅनेजमेंट कोटा नाही. इन्स्टिटय़ुशनल कोटय़ातून प्रवेश देण्यासाठी मान्यताप्राप्त फी व्यतिरिक्त 16 लाख रुपयांची लाच नेमकी कोणापर्यंत पोहोचणार होती? आयुक्त, आरोग्यप्रमुख यांचे व राजकीय नेत्यांचे लागेबांधे होते का? याच्यात अजून कोणाचे हात ओले झाले आहेत का, याबाबतची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.








