ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असतानाच पक्षात नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसून येते. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. परंतु त्यांना भाषणच करू दिलं नसल्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येते.
नाराजीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना वसंत मोरे म्हणाले, मी नाराज नाही, कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सर्व कोअर कमिटीचे मेंबर आले होते. मी ही त्या स्टेजवर बसलो आहे तर मला बोलू दिलं जाईल, असं कार्यकर्त्यांना वाटलं होतं. परंतु मला बोलायची संधी दिली नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का भाषण नाही केलं? असा प्रश्न विचारला. मी म्हटलं, भाषणाच्या यादीत माझं नावच नाही तर मी कसं भाषण करणार?
अधिक वाचा : आसाममध्ये छ. शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
दरम्यान, वसंत मोरे यांना स्थानिक पदाधिकारी डावलत असल्यामुळे वसंत मोरे यांची नाराजी कायम आहे. पुणे शहरात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद सुरू झाला आहे. आता राज ठाकरे वसंत मोरे यांची नाराजी कशी दूर करणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.