ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनविण्यात गुजराती आणि राजस्थानी लोकांचे योगदान उल्लेखनीय आहे. या लोकांना मुंबईतून काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळखही पुसली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. राज्यपालांच्या या वक्तव्याविरोधात आता मनसेही आक्रमक झाली आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळं मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. त्यामुळे मुंबईचा अपमान हा मराठी माणसांचा अपमान आहे. मराठी माणूस हे खपवून घेणार नाही. ज्या गोष्टी कळत नाहीत, तिथे राज्यपालांनी नाक खपसू नये, असे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
देशपांडे म्हणाले, मराठी माणसाच्या त्यागामुळं मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जी धोरणं आखली त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले, म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र प्रगत झाला आहे. महाराष्ट्राचा अपमान कदापी सहन करणार नाही.
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे. मुंबईत इतर लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही. 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी समजत नाहीत, त्या गोष्टीत त्यांनी नाक खुपसू नये, असेही देशपांडे म्हणाले.
हेही वाचा : FTII ने OBC, SC आणि ST प्रवर्गातील जागा भरल्याच नाहीत, स्टुडंट असोसिएशनचा आरोप








