ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसेची बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकारिणी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी तडकाफडकी बरखास्त केली आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ठाणे जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत कामाचा आढावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर राज ठाकरे यांनी तडकाफडकी या दोन्ही कार्यकारिणी बरखास्त केल्या. पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना बदलापूर आणि उल्हासनगरची नवी कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.








