ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबईत (Mumabi) आगामी काळात पालिका निवडणूक होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे कुटुंबाने अनेकांना पदे दिली पण आपण स्वतः हून कोणतेही पद घेतले नाही. परंतु ठाकरे कुटुंबाची ही परंपरा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोडल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) हेही त्याच मार्गानं जाण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत विजयी मिळविण्यासाठी प्रत्येक नेता घरापर्यंत पोहोचत आहे. एकंदरीत सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सध्या निवडणुकीसाठी सक्रीय दिसत आहेत. अशातच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेही महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी एका मुलखती दरम्यान केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. तसेच, पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्याचवेळी अमित ठाकरे यांनी औरंगाबाद येथे काही पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांना विधानसभा निवडणूक लढवणार का, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरे यांनी “पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही लढवायला तयार आहे”, असे उत्तर दिले.
हे ही वाचा : ठाकरेंच्या ‘मशाली’नंतर शिंदेंची ‘ढाल-तलवार’ही वादाच्या भोवऱ्यात
अमित ठाकरे यांच्या या उत्तरामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यापूर्वी कार्यकर्त्यांसमोर बोलताना निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र, नंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळं अमित ठाकरे नेमकं काय करणार, याविषयी उत्सुकता आहे.








