खानापूर : गेल्या सहा महिन्यापासून थकीत असलेले वेतन देण्यात यावे, म्हणून मनरेगा कर्मचाऱ्यांनी सोमवारी तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. तसेच सहा महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ता. पं. व्यवस्थापक सपटला यांना देण्यात आले. सपटला यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण निवेदन वरिष्ठांकडे पाठवून देवू, असे आश्वासन दिले. तालुक्यात मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका पंचायत माध्यमातून 54 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मनरेगा योजनेची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येते. मात्र या कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही.
त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून पगार देण्यात यावा, म्हणून मागणी करण्यात येत होती. मात्र शासनाकडून पगार देण्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात येत नसल्याने शेवटी राज्यभर आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खानापूर तालुका मनरेगा कर्मचाऱ्यांनी ता. पं. कार्यालयात सोमवारी सकाळी काम बंद करून आंदोलन केले. आणि पगार देण्यात यावा, यासंबंधी निवेदन दिले. यावेळी साताप्पा इरगार, शशिधर सत्तीगेरी, महांतेश जंगटी, गणेश अलबादी, महांतेश बाळेकुंद्री, दर्शन शिवन्नावर यांच्यासह सर्व नरेगा कर्मचारी सहभागी झाले होते.









