पोलीस आयुक्तांना बंदोबस्ताची केली सूचना, विशेष पथक कार्यान्वित
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरामध्ये चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी असे प्रकार सुरू असून याबाबत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी चर्चा करण्यात आली असून याला चाप लावण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली आहे. नियम डावलून रस्ता निर्माण केल्याप्रकरणी मनपाला 20 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागत आहे. यावर कायदेशीर लढा दिला जाईल, असे आमदार राजू सेठ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे शहरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिसांशी चर्चा करण्यात आली असून पोलीस आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना राबविण्यास सांगितले आहे. यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली आहे, असे आमदार सेठ यांनी सांगितले.
शहरामध्ये रस्ता निर्माण करण्यासाठी नियमांचे पालन न करता जमीन संपादन करण्यात आली आहे. परिणामी जमीन गमावलेल्या मालकाला मनपाने 20 कोटी भरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा केला जाणार असून ही प्रक्रिया राबविताना अधिकाऱ्यांकडून झालेल्या चुकीची चौकशी केली जाणार आहे. यासाठी कायदेशीर लढाई देण्याची तयारी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. तर मुडा प्रकरणी आमदारांनी आंदोलन हाती घेतले आहे. या आंदोलनात आपण सहभागी होणार होतो. तब्येत बिघडल्याने आंदोलनात सहभाग घेतला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून जिल्ह्यातील सर्व मंत्री व आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.









