प्रतिनिधी /वास्को
वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी वर्षपध्दतीप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत गणेश मूर्ती विसर्जन स्थळी निर्माल्य गोळा करण्याचे कार्य पार पाडले. तर दुसरीकडे बोगमाळोचे सरपंच जगन्नाथ उर्फ संकल्प महाले यांनी आपल्या सहकाऱयांसोबत किनाऱयावर आलेल्या विसर्जीत गणेश मूर्ती उचलून किनारा स्वच्छ करण्याचे आणि गणेश भक्तांच्या भावना जपण्याचे कार्य पार पाडले.
दरवर्षी दीड दिवसांच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱया दिवशी सकाळी किनाऱयावर सर्वत्र निर्माल्य पसरल्याचे आणि दुभंगलेल्या मूर्ती इकडे तिकडे पडल्याचे सर्रास दिसून येते. हा प्रकार प्रदुषणकारी असल्याने आणि भक्तांच्या भावना दुखावणाऱया असल्याने काही जण हा प्रकार रोखण्यासाठी दक्षता घेतात तर काही लोक अगदीच बेफिकीर असतात. काही वर्षांपूर्वी समुद्रात फेकण्यात येणाऱया निर्माल्यामुळे वास्कोत बरीच समस्या दिसून येत होती. बारा वर्षांपूर्वी त्यावेळचे नगरसेवक व आताचे वास्कोचे आमदार दाजी साळकर, त्यांच्या पत्नी क्षमी साळकर व इतर सहकाऱयांनी गणेश विसर्जन स्थळी उपस्थित राहून निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला होता. त्याला हळुहळु चांगले यश येत गेले. मोठय़ा प्रमाणात गोळा केलेले हे निर्माल्य नंतर एमईएस महाविद्यालयाकडे सुपुर्द केले जात होते. महाविद्यालयात या निर्माल्यापासून खत तयार केले जाते. हा उपक्रम यंदाही कायम राहिला.
आमदार दाजी साळकर, नगरसेविका क्षमी साळकर तसेच काही कार्यकर्ते बायणा किनारा, खारवीवाडा किनारा तसेच वाडेतील तळय़ाजवळ गणेश मूर्तीच्या विसर्जन स्थळी निर्माल्य गोळा करण्यासाठी जातीने हजर होते. यंदाही दीड दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी गणेश भक्तांनी निर्माल्याचे पावित्र्य जपण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
दुसरीकडे चिकोळणा बोगमाळो पंचायतीचे सरपंच संकल्प महाले यांनी बोगमाळो किनाऱयावर आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्ती किनाऱयावरून उचलण्याचे कार्य पार पाडले. आपल्या काही सहकाऱयांसमवेत त्यांनी स्वता काही मूर्ती उचलल्या. काही मूर्ती किनाऱयावरील वाळूत रूतल्या होत्या. त्या त्यानीच काढल्या. सरपंच महाले यांच्या म्हणण्यानुसार बोगमाळोच्या किनाऱयावर चारशेहून अधिक गणेश मूर्ती दीड विसर्जनासाठी आल्या होत्या. त्यापैकी सोळा गणेशमूर्ती पाण्यात विर्सजीत न होता किनाऱयावर आल्या. त्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या होत्या. अशा प्रकारच्या मूर्तीमुळे जलाचरांवर परीणाम होतो. शिवाय दुभंगलेल्या मूर्ती सकाळी लोकांच्या पायाखाली येतात. त्यामुळे श्रध्दाळूंच्या भावना दुखावतात. असे प्रकार घडू नयेत यासाठी गणेश भक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूतींचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले.









