पुणे / प्रतिनिधी :
ठाकरे गटाच्या आमदारांशी बोलणी सुरू असून, हे आमदार आमच्या पक्षात यायला तयार असल्याचा खळबळजनक दावा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बुधवारी पुण्यात केला.
पुणे दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देसाई म्हणाले, ठाकरे गटातील आमदार आमचे मित्र आहेत. आमचे त्यांच्यासोबत बोलणे सुरू असून, त्यांची याबाबतची भूमिका अनुकूल अशीच आहे. लवकरच काही आमदार शिंदे गटात येतील. ठाकरे गटातील आमदार नाराज आहेत. त्यामुळे शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहील, अशी स्थिती नाही.
खोक्यांवरून बदनामीची मोहीम शिल्लक सेनेकडून सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून आमच्यावर खोक्याचे आरोप केले जात आहेत. खोक्याचा आरोप प्रत्येक आमदारावर केला जात आहे. आम्ही कोणते खोके घेतले, कशाचे खोके घेतले आणि कुणी खोके घेतले, हे टीकाकारांनी स्पष्ट सांगावे. अस्पष्ट वा संदिग्ध बोलू नका, खोक्यांबाबतचे सगळे पुरावे आम्हाला द्या, असे सुनावतानाच या आरोपांसाठी आता आम्ही कायद्याची मदत घेणार आहोत. कायदेशीर मार्गानेच या प्रकरणाची तड लावू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
अधिक वाचा : निर्मला सीतारामन यांचा डिसेंबरमध्ये पुन्हा बारामती दौरा
आदित्य ठाकरेदेखील प्रत्येक ठिकाणी आमच्यावर टीका करत आहेत. आता जे काही बोलणे किंवा समजूत काढणे सुरू आहे, ते अडीच वर्षापूर्वी व्हायला हवे होते. आम्हा 50 आमदारांच्या उठावामुळे त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे त्यांना नैराश्य आले असावे. सत्ता नसल्याने तळमळ सुरू झाली असून, त्याचा राग आता ते काढत असल्याचा आरोपही देसाई यांनी केला.








