बेळगाव : महिला व बालकल्याण सारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद मिळाले ते फक्त बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील जनतेमुळेच. त्यासाठी या मतदारसंघातील जनतेची चिरऋणी राहीन, असे उद्गार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काढेल. बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाड येथे काँग्रेस कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीने लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मंत्री झाल्याबद्दल रविवारी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने काँग्रेस सरकार हळूहळू पूर्ण करेल. याबाबत कुणालाही संभ्रम किंवा शंका नसावी. प्रकल्प सुरू झाल्यानंतर समस्या उद्भवू नयेत म्हणून प्रकल्पांना काही दिवस विलंब होत आहे. तसेच गृहलक्ष्मी, शक्ती, अन्नभाग्य आदी हमी योजना महिलांना सक्षमीकरणाकडे घेऊन जाणार आहेत. गृहलक्ष्मी माझ्या विभागाशी संबंधित असल्याने महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेद्वारे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे भाग्य मला लाभले याचा खूप अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या.









