राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आज सकाळी अजित पवार गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार य़ांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. त्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात चाललेल्या घडामोडीमधून मार्ग काढण्याची विनंती केली असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी आजही विरोधी पक्षामध्ये असून कोणालाही शरद पवारांना भेटण्याची मुभा आहे. त्यामुळे त्यांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.
मुंबईत आज वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाची भुमिका मांडली ते म्हणाले, “पक्षातून वेगऴी भुमिका घेतलेल्या काही आमदारांनी आज शरद पवारांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. कालसारखीच त्यांनी आजही पक्षात आणि विधीमंडळात जो पेच निर्माण झाला आहे त्यावर मार्ग काढण्य़ाची विनंतीही त्यांनी केली. जे कालपर्यंत शरद पवारांना घरी बसा म्हणत होते तेच आज पवारांना मार्ग काढण्य़ाची विनंती करत आहेत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “पवारसाहेब कोणालाही भेटू शकतात. वेगळी भुमिका घेतलेल्या आमदारांना भेटल्यावर शरद पवारांच्या भुमिकेवर प्रश्न निर्माण करण्याचे कारण नाही. राजकारणात संवाद महत्वचा आहे. फक्त 9 लोकांनी वेगळी भुमिका घेतली आहे बाकि आमदार आमच्यासोबतच आहेत. आणि आम्ही सर्व एक आहोत.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादी आजही विरोधी पक्षामध्ये आहे. पवारांनी आपली भुमिका येवल्यात स्पष्ट केली आहे. मागल्य़ा निवडणूका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे एकत्र लढलो होतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर गेलो आहोत. प्रश्न त्यांना पडलाय त्यामुळे यात टाळण्याचा कोणताच विषय नाही. पवारसाहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले कि आपण सर्व पक्षाचे काम करत असून य़ुपीएमध्ये आहोत.”








