मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी : खानापुरात शपथविधी ठरला एक चर्चेचा विषय
खानापूर : खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचा विधानसभेतील शपथविधी खानापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. खानापूर तालुक्यातील समिती आमदारांची मराठीत शपथ घेऊन मराठी बाणा दाखवून देण्याची परंपरा होती. समितीचे आमदार मराठीतून शपथ घेत होते. भाजपचे आमदार प्रल्हाद रेमाणी यांनीही मराठीत शपथ घेतली होती. नव्याने काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्याने विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सोमवारी आमदारांना शपथ देण्यात आली. खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर शपथ घेत असताना मागून कन्नडमध्ये बोला, कन्नडमध्ये बोला, असा आवाज आला. त्यावेळी मी कन्नडमध्ये शपथ घेत आहे, असे सांगत त्यांनी कन्नडमध्ये शपथ घेतली. विठ्ठल हलगेकर हे स्वत: मराठी भाषिक असून त्यांचे शिक्षण मराठी मातृभाषेतून झाले आहे. अन् त्यांनी स्वत: एका मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. विधानसभेत प्रवेश करतेवेळी त्यांच्या डोक्यावर भगवा फेटा होता. मात्र, विधानसभेत आपण कन्नडमध्ये शपथ घेणार असल्याचे जाहीर करताच मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त झाला. संपूर्ण तालुक्यातील मराठी भाषिकांची मते मोठ्या प्रमाणात घेतल्यानेच हलगेकर यांना 54 हजाराचे मताधिक्य घेता आले. मात्र विधानसभेत त्यांनी कन्नडमध्ये शपथ घेतल्याने मराठी भाषिक मतदारांतून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात त्यांच्या शपथविधीचीच चर्चा सुरू झाली आहे. मराठी भाषेचा जागर करून तसेच शिवरायांचे नाव घेऊन आपल्या निवडणुकीत प्रचार केलेले, तसेच शिवगर्जना या महानाट्याचे प्रयोग करून मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हलगेकर यांनी आटापिटा केला होता. मात्र विधानसभेत जाताच आपण कन्नडप्रेमी असल्याचे त्यांच्या वर्तनावरून सिद्ध झाले आहे. यामुळे मराठी भाषिक भाजप कार्यकर्त्यांतूनही नाराजी व्यक्त होत आहे.









