करचुकवेगिरी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई : अटकेची शक्यता : गोव्यासह राज्यभरात 16 ठिकाणी छापे
प्रतिनिधी/ बेंगळूर
करचुकवेगिरी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चित्रदुर्गचे काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. सिक्कीम दौऱ्यावर असलेल्या के. सी. वीरेंद्र यांना कोलकाता येथील ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांना बेंगळूरला आणले जात आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी पहाटे 4:30 च्या सुमारास ईडीच्या पथकाने बेंगळूर, चित्रदुर्ग, चळ्ळकेरे, हुबळी, गोव्यासह एकूण 17 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईवेळी अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळण्यात आली. शिवाय आमदार वीरेंद्र यांच्या निवासस्थानी 1 किलोपेक्षा अधिक सोने आढळून आले आहे.
चित्रदुर्गमधील आमदार वीरेंद्र पप्पी आणि इतर प्रकरणांत ईडीने गुरुवारी बेंगळुरात 10, चित्रदुर्ग जिल्ह्यात 6 ठिकाणी, जोधपूरमध्ये 3, हुबळीत 1, मुंबईत 2, गोव्यात पाच कॅसिनोसह 8 ठिकाणी ईडीच्या पथकांनी धाडी टाकल्या आहेत. करचुकवेगिरी आणि गेमिंग अॅपसंबंधी तक्रार झाल्याने ईडीने इसीआयआर दाखल करून ही कारवाई केली आहे. वीरेंद्र यांच्या रत्ना गोल्ड, रत्ना मल्टी सोर्स, पप्पीज टेक्नॉलॉजीस, रत्ना गेमिंग सोल्युशन्ससह इतर कंपन्यांकडून पैशांचा बेकायदा व्यवहार झाल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार वीरेंद्र पप्पी हे किंग 567, राज 567, पप्पीज 003, रत्न गेमिंग आदी ऑनलाईन बेटींग साईट चालवत असल्याचा आरोप आहे. वीरेंद्र पप्पी यांना बेंगळूरच्या शांतीनगर येथील कार्यालयात चौकशी केल्यानंतर अटक करण्याची शक्यता आहे. वीरेंद्र यांचे बंधू के. सी. तिप्पेस्वामी दुबईतून डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीस आणि प्राईम 9 टेक्नॉलॉजीस या नावाने तीन संस्था चालवत आहेत. त्यांचे आणखी एक बंधू के. सी. नागराज यांच्या मालमत्तांवरही धाडी टाकून झडती घेण्यात आली आहे. या संस्थांची कॉल सेंटर सेवा आणि वीरेंद्र यांच्या गेमिंग व्यवहाराशी संबंध असल्याचे आढळले आहे.
पराभूत उमेदवाराच्या निवासस्थानावरही धाड
त्यापाठोपाठ 2023 मध्ये बेंगळूरच्या राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काँग्रेस नेत्या कुसुमा हनुमंतरायप्पा यांच्या निवासस्थानावरही धाड टाकण्यात आली. आमदार वीरेंद्र यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे गोव्यातील पणजी येथे मॅजेस्टीक प्राईड कॅसिनो चालविणारा हवाला प्रकरणातील किंगपीन समुंदर सिंग याच्या हुबळीतील देशपांडेनगरमधील कामाक्षी अपार्टमेंटवरही ईडीने धाड टाकून तपासणी केली. कर चुकविल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
2016 मध्ये ‘प्राप्तिकर’ने केली होती कारवाई
यापूर्वी 11 डिसेंबर 2016 रोजी के. सी. वीरेंद्र पप्पी यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. त्यावेळी त्यांच्या घराच्या बाथरुममध्ये 5 कोटी रु, 30 किलोपेक्षा अधिक सोने आढळून आले होते.









