वाढत्या गुन्ह्यांचा पर्यटनावरही परिणाम होणार
प्रतिनिधी/ मडगाव
फातोर्डाचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल कडक शब्दांत समाचार घेऊन गोव्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे शनिवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सहा दिवसांतील चार खुनांच्या प्रकारांमुळे गोव्याची सर्वत्र बदनामी होऊ लागलेली असून एक वेळ सुरक्षित गोवा असे म्हणणारे आता गुन्हेगारांसाठी गोवा सुरक्षित असे म्हणू लागले आहेत. या सर्व घटनांचा गोव्याच्या पर्यटनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे, असे सरदेसाई यानी सांगितले.
या सर्व घटनांनंतर गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पोलीस प्रमुख डीजीपी यांच्या मौनामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री व पोलीस प्रमुखांकडून गुन्हेगारीच्या घटना थोपविण्यासाठी कडक उपाययोजनांची नागरिकांना अपेक्षा आहे, असेही सरदेसाई यानी सांगितले.
सध्या या सर्व गुन्हेगारी घटनांमध्ये जरी परप्रांतियांचा सहभाग असला, तरी भविष्यात ही पाळी गोमंतकीयांवर सुद्धा येऊ शकते याचे भान मुख्यमंत्र्यांनी ठेवून त्याप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. गोव्यात महिलांवरील अत्याचार सुद्धा वाढलेले दिसतात. त्यामुळे जर महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल, तर सर्वप्रथम त्यांना सुरक्षित करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे
सध्या जी गुन्हेगारी वाढली आहे त्यासाठी पोलिसांकडे व्यापक धोरण काय आहे हे लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. गोव्यात गुन्हेगारी घटनांची जास्त प्रमाणात नोंद होते हे त्यावर उत्तर नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली. पोलिसांनी केवळ महसूल वाढीकडे लक्ष न देता गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टींसंदर्भात आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपल्या कारकिर्दीत गोव्यात गुन्हेगारी का वाढली, पुनरावलोकन किंवा आढावा बैठका कधी घेतल्या काय, उपाय घेतले आहेत का यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करणे गरजेचे असल्याचे सरदेसाई म्हणाले.
जर यातील काहीही केले नसेल, तर आपण त्यांना खालील चार सूत्री उपाय सुचवू पाहतो. सर्वप्रथम परप्रांतीय जेथे राहतात तेथे कडक पाळत ठेवणे, गस्त घालणे, जे दादागिरी करतात त्यांना कडक शब्दांत समज देणे किंवा अटक करणे. दुसरी सूचना म्हणजे पोलीस गुप्तचर दर्जा वाढविणे, तिसरी सूचना असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरविणे व चौथी आणि महत्त्वाची सूचना म्हणजे बाराही तालुक्यांत महिला पोलीस चौक्या सुरू कराव्यात, असे सरदेसाई यांनी सांगितले.









