खासदार साहेबांनी खिंडवाडीतल्या बेकायेदशीर उत्खननावर बोलावे; मेडिकल कॉलेज कोणा एकटय़ाचे नाही
सातारा प्रतिनिधी
खासदारसाहेब बाजार समितीचे सचिव रघुनाथ मनवे यांच्याबाबत बोलत आहेत. मनवे यांच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलेला आहे. खासदार साहेबांचा कोर्टावर विश्वास नाही का?, कोर्टाने दिलेल्या निर्णयावर विश्वास नाही का?, त्यांनी कोर्टाला जावून विचारावे तसे. निकाल झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार मनवे पुन्हा कामावर तेथे रुजू झालेत. खासदारसाहेब कोर्टापेक्षा मोठे आहेत काय?, अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांना प्रतिउत्तर दिले. दरम्यान, खासदारसाहेबांनी खिंडवाडीतल्या बेकायदेशीर उत्खननावर बोलावे, असेही आव्हान त्यांनी दिले. तसेच मेडिकल कॉलेज कोणा एकटय़ाचे नाही, अशा शब्दातही ठणकावले.
खिंडवाडीतल्या बेकायदेशीर खाणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची आमदार शिवेंद्रराजेंनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मागे खासदारासाहेबांनी बाजार समितीच्या भ्रष्टाचारावरुन आम्हाला यांच्यासोबत रहायचे नाही असे म्हणत त्यांच्या लोकांचे राजीनामे घेवून बाहेर पडले. त्यांनी एवढे स्टंट घेतला त्या चौकशीचे काय झाले. दुसरे ते मनवेंच्याबाबत बोलत आहेत. मनवेंचा कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे. खासदारसाहेबांचा कोर्टावर विश्वास नाही का, कोर्टाने दिलेल्या निकालावर खासदार साहेबांचा विश्वास नाही का, त्यांनी कोर्टाला जाब विचारावा की तुम्ही असा का निकाल दिला म्हणून किंवा निकाल झाल्यानंतर त्यांच्यातून मनवेंना कोर्टाच्या निर्णयानुसार कामावर हजर करुन घेतले आहे. खासदारसाहेब कोर्टापेक्षा मोठे आहेत काय?, काय खासदार साहेब म्हणतील तेच खरे. खासदारसाहेबांनीही खिंडवाडीतील बेकायदेशीर उत्खननाबाबत बोलावे. सांगावे काय प्रकार आहे ते. साताऱयात काही लोकांना अशी सवय आहे की बोलायचे भरपूर आणि कृती शुन्य. त्यांचा काम करण्याचा प्रकार वेगळा आहे. आपल्याकडे मराठीत म्हण आहे की मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली आहे. बाहेर दाखवायचे वेगळे मी किती चांगला जे काय प्रकार चाललेत मेडीकल कॉलेज असू द्यात. मेडील्कल कॉलेजचे काम बंद पाडणे, असले प्रकार होवू नये. मेडिकल कॉलेज कोणा एकटय़ाचे नाही हे लोकप्रतिनिधींनी विसरु नये. जे काम कानावर प्रकार येतात ते घडू नये. काम गतीने आणि सुरळीत पूर्ण व्हावे. मेडिकल कॉलेजची मुलं ऍडमिशन घेवून शिकत आहेत. काम जर रखडायला लागले तर अडचणी निर्माण होणार आहेत. त्याची कुठेतरी दखल, विचार या लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी खासदार उदयनराजेंना दिला.
जिल्हा बँकेला कोणतीही नोटीस नाही
जिल्हा बँकेबाबत छेडले असता ते म्हणाले, माझ्या माहितीने जिल्हा बँकेला ईडी किंवा कुठली नोटीस नाही. मागे जी माहिती मागवली होती. ती घेवून गेलेत तो विषय तिथेच संपलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
खासदार साहेबांना सगळीकडे फिरु द्या
खासदार उदयनराजे यांच्या दौऱयाबाबत छेडले असता ते म्हणाले, त्यांचे दौरे वाढलेत चांगले आहे. पंधरा वर्षानंतर दौरे वाढले अतिशय चांगले आहेत. लोकांना पण आता 15 वर्षात खासदार म्हणून आपण कोणाला निवडून दिले हे कळू द्या.









