बेंगळुरात चौकशीनंतर ईडीची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मंगळवारी चौकशीसाठी आमदार सतीश सैल बेंगळुरातील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. सखोल चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली.
ऑगस्ट महिन्यात 13 आणि 14 तारखेला आमदार सतीश सैल यांच्या निवासस्थानावर ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी त्यांच्याजवळ बेहिशेबी मालमत्ता, रोकड, सोने आढळले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना मंगळवार 9 सप्टेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी ते बेंगळूरमधील ईडीच्या कार्यालयात हजर झाले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. बौरिंग हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
बेकायदा लोहखनिज वाहतूक प्रकरणी ऑगस्ट महिन्यात आमदार सैल यांच्या निवासस्थानी ईडीने टाकलेल्या छाप्यात मोठे घबाड आढळले होते. कारवार, गोवा, मुंबई व दिल्लीत सैल यांच्याशी संबंधित ठिकाणी झडती घेण्यात आली होती. यावेळी आढळलेले सोने, रोकड व संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले होते.









